महाराष्ट्रातील दिघीसह देशातील १२ औद्योगिक प्रकल्पांना केंद्राची मंजुरी

Union Cabinet Decision | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी
महाराष्ट्रातील दिघीसह देशातील १२ औद्योगिक प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
Pudhari News Network
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील दिघी येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाचाही समावेश आहे. दिघी औद्योगीक प्रकल्पासाठी ५ हजार ४६९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. (Union Cabinet Decision)

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सरकार १२ औद्योगिक प्रकल्पांवर २८ हजार ६०२ कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे सुमारे १० लाख रोजगार निर्माण होतील. या प्रकल्पांमध्ये उत्तराखंडमधील खुरपिया, पंजाबमधील राजपुरा पटियाला, महाराष्ट्रातील दिघी, केरळमधील पलक्कड, उत्तर प्रदेशातील आग्रा आणि प्रयागराज, बिहारमधील गया, तेलंगणातील झहीराबाद, राजस्थानमधील पाली आणि आंध्र प्रदेशातील वरक्कल आणि कोपर्थी यांचा समावेश आहे. (Union Cabinet Decision)

 दिघी येथे १ लाख १४ हजार १८३ नोकऱ्या उपलब्ध होणार 

महाराष्ट्रातील दिघी औद्योगिक प्रकल्पाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, त्यासाठी ६ हजार ५६ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे १ लाख १४ हजार १८३ नोकऱ्या निर्माण होतील. त्यांनी सांगितले की हे औद्योगिक विकास क्षेत्र मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. इतकेच नाही तर कोलाड रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर आणि इंदापूर, माणगावपासून १० किलोमीटर अंतरावर आहे. येथून मुंबई विमानतळाचे अंतर १७० किलोमीटर आहे. या प्रकल्पापासून दिगी बंदर केवळ ५५ किलोमीटर अंतरावर आहे. बंदराप्रमाणे दिगी औद्योगिक क्षेत्राचे औद्योगिकीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही केंद्रीय मंत्र्यांनी दिली. (Union Cabinet Decision)

केंद्रीय मंत्री म्हणाले की, या प्रकल्पासाठी २ हजार ३१३ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. यावर उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांतर्गत सुमारे ४२ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.

रेल्वेच्या तीन प्रकल्पांना मंजुरी

केंद्र सरकारने रेल्वेच्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांनाही मंजुरी दिली. जमशेदपूर, पुरुलिया, आसनसोल कॉरिडॉरसाठी तिसरी लाईन मंजूर झाली आहे. ओडिशातील सुंदरगड ते छत्तीसगडमधील रायगडला जोडण्यासाठी सरदेगा दुहेरी मार्ग भालुमुडा लाइन बांधली जाईल.

२३४ शहरांमध्ये खासगी एफएम रेडिओ

केंद्रीय मंत्रिमंडळाने २३४ शहरांमध्ये ७३० खाजगी एफएम रेडिओ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यात महाराष्ट्रातील ११ शहरांचाही समावेश आहे (अचलपूर, बार्शी, चंद्रपूर, गोंदिया, लातूर, मालेगाव, नंदुरबार, धाराशिव, उदगीर, वर्धा आणि यवतमाळ).

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news