

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयओएस १८ (iOS 18) सॉफ्टवेअर अपडेटनंतर iPhones च्या कथित परफॉर्मन्स समस्यांबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) अॅपलला (Apple Inc) नोटीस बजावली आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली. या नोटीसीतून सॉफ्टवेअर अपडेटमधील तांत्रिक समस्यांबाबत ॲपलकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
"ग्राहकांच्या तक्रारींची चौकशी केल्यानंतर ग्राहक संरक्षण प्राधिकरणामार्फत Apple ला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे," असे जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
आयफोन परफॉर्मन्सच्या समस्यांसंदर्भात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर तक्रारी आल्या आहेत. iOS 18+ वर अपडेटनंतर डिव्हाइसचा परफॉर्मन्स कमी होणे आणि तांत्रिक बिघाड यासारख्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. याची दखल घेत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲपलला नोटीस जारी केली आहे.