

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) त्रि-भाषा सूत्रावरून (Three-Language Policy) निर्माण झालेल्या गदारोळानंतर नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आगामी वर्षांत इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार नाही, असे बोर्डाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र, आता या धोरणाबाबत निर्माण झालेल्या विविध शंकांचे निरसन करताना बोर्डाने एक महत्त्वाची नियमावली जारी केली आहे.
जर एखादा विद्यार्थी ९ वीमध्ये तिसऱ्या भाषेत अनुत्तीर्ण झाला, तर त्याला १० वीत प्रवेश कसा मिळणार आणि या विषयात उत्तीर्ण होणे कितपत अनिवार्य आहे, याविषयी बोर्डाने सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
सीबीएसईने प्रसिद्ध केलेल्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या (FAQ) उत्तरांमध्ये नमूद केले आहे की, इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या भाषेची (R3) परीक्षा आणि त्याचे मूल्यमापन पूर्णपणे अंतर्गत मूल्यमापनाच्या (Internal Assessment) माध्यमातून केले जाईल. म्हणजेच, संबंधित शाळेतील शिक्षकांमार्फतच हे मूल्यमापन होईल. हीच तुकडी जेव्हा इयत्ता १० वीमध्ये (शैक्षणिक वर्ष २०२७-२८) प्रवेश करेल, तेव्हा त्यांना तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. परंतु, बोर्ड परीक्षा नसली तरीही या तिसऱ्या भाषेत उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनिवार्य असणार आहे.
बोर्डाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, सीबीएसईचे १० वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (Passing Certificate) मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर होणाऱ्या या मूल्यमापनात उत्तीर्ण व्हावेच लागेल. जर एखादा विद्यार्थी ९ वीमध्ये तिसऱ्या भाषेत अनुत्तीर्ण झाला, तर त्याला तात्पुरते १० वीच्या वर्गात पदोन्नत (Promote) केले जाईल. मात्र, १० वीचा अभ्यास करत असतानाच त्या विद्यार्थ्याला ९ वीच्या तिसऱ्या भाषेची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. जर एखादा विद्यार्थी १० वीमध्येही या विषयात उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर १० वीचा मुख्य निकाल घोषित होण्यापूर्वी शाळा स्तरावर त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल आणि त्यात उत्तीर्ण झाल्यानंतरच त्याला उत्तीर्ण घोषित केले जाईल.
सध्या ७ वी आणि ८ वीत असणारे विद्यार्थी जेव्हा पुढील वर्षांत ९ वी आणि १० वीत जातील, तेव्हा त्यांनाही तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल, ज्यामध्ये दोन भारतीय भाषा असणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच दोन परदेशी किंवा अ-भारतीय भाषा निवडल्या आहेत, त्यांना तिसरी भाषा म्हणून एका भारतीय भाषेची निवड करावी लागेल. या विद्यार्थ्यांसाठीही तिसऱ्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही.
दुसरीकडे, सध्या इयत्ता ६ वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आगामी सर्व तुकड्यांसाठी दोन भारतीय भाषांचा अभ्यास करणे सक्तीचे राहील. ही तुकडी जेव्हा पुढे चालून इयत्ता १० वीमध्ये पोहोचेल, तेव्हा मात्र त्यांना तिसऱ्या भाषेची (R3) बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे.