

नवी दिल्ली : आपल्या अवतीभोवतीच्या निसर्गात अनेक वेगवेगळेपशू-पक्षी, वनस्पती आहेत. मात्र, बऱ्याचवेळा काही माहिती ही आश्चर्यकारकच असते. कॅसोवेरी पक्षी हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्षी असून तो उडू शकत नाही. परंतु, मजबूत पायांमुळे तो जमिनीवर व पाण्यात फिरू शकतो. हा बहुतांशी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियामधील काही भागांत प्रामुख्याने आढळतो. कॅसोवेरी पक्षी काळसर पिसाचा असून त्याच्या डोक्यावर शिंगासारखा टोकदार कठीण भाग असतो.
गळा व मान ही जांभळट, तांबड्या रंगाची असते. सध्या मात्र मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे त्यांची संख्या कमी होताना दिसते. दिसायला आकर्षक असला तरी त्याच्याजवळ जाणे धोकादायक असते. कारण तो स्वरक्षणासाठी कदाचित आपल्याला इजाही करू शकतो. या पक्ष्यांची पर्यावरणातील भूमिका खूप महत्त्वाची आहे. तो अनेक प्रकारच्या वनस्पतींच्या बिया जंगलात विखरत असल्यामुळे साहजिकच पर्यावरणाचे रक्षण होते.