

पुढारी ऑनलाईन डेस्क : "एखाद्याला 'मियाँ-तियाँ' किंवा 'पाकिस्तानी' म्हणणे चुकीचे असले तरी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम २९८ अंतर्गत धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्यात मोडत नाही," असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने( Supreme Court) धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणातील संशयित, ८० वर्षीय हरि नारायण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली.
झारखंडमधील बोकारो येथील चास येथील उपविभागीय कार्यालयात उर्दू भाषांतरकार आणि कार्यवाहक लिपिक (माहितीचा अधिकार) मोहम्मद शमीमुद्दीन यांनी या प्रकरणी फिर्याद दिली हाेती. त्यांनी आरोप केला हाेता की, माहिती अधिकार अर्जासंदर्भात माहिती देण्यासाठी ते अपीलकतेर्ते ८० वर्षीय हरि नारायण सिंह यांच्याकडे गेले हाेते. यावेळी हरि नारायण सिंह यांनी त्यांना 'मियाँ-तियाँ' आणि पाकिस्तानी असे संबाेधले.शमीमुद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हरि नारायण सिंह यांविरुद्ध कलम २९८ (धार्मिक भावना दुखावणे), ५०४ (जाणीवपूर्वक अपमान आणि शांतता भंग), ५०६ (गुन्हेगारी कट रचणे), ३५३ (सरकारी सेवकाशी गैरवर्तन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला हाेती. पोलिसांनी हरि नारायण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. जुलै २०२१ मध्ये, दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत संशयित आरोपीवर समन्स जारी केले. हरि नारायण सिंह यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि त्यानंतर उच्च न्यायालयात अपील दाखल केले. मात्र दिलासा न मिळाल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
संबंधित याचिकेवर न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ११ फेब्रुवारी दिलेल्या निकालात खंडपीठाने म्हटलं आहे की, "एखाद्याला 'मियाँ-तियाँ' किंवा 'पाकिस्तानी' म्हणणे निःसंशयपणे चुकीचे आहे; पण या प्रकरणात याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. या टिप्पण्या चुकीच्या हाेत्या; परंतु हे प्रकरण भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम २९८ अंतर्गत धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्यात मोडत नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने हरि नारायण सिंह यांच्यावरील धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणाचा खटला फेटाळला.