

नवी दिली : मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ५०८ किलोमीटर अंतर धावण्यासाठी देशातील नियोजित पहिली बुलेट ट्रेन २०२९ मध्ये सुरू होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. असे असले तरी मंत्रालयाने संभाव्य तारीख दिलेली नाही. मात्र बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, ऑगस्ट २०२७ पासून प्रवासी बुलेट ट्रेनने प्रवास करू शकतात. गुजरातमधील सुरत ते वापी दरम्यानचे १०० किलोमीटरचे हे अंतर असेल. तसेच देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या डिसेंबरमध्ये सेवा सुरू करणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्णपणे पूर्ण होईल. ऑगस्ट २०२७ मध्ये सुरत ते वापी दरम्यानच्या १०० किलोमीटरच्या मार्गावर पहिला टप्पा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. बुलेट ट्रेनचा वेग ३२० किलोमीटर प्रति तास असणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ५०८ किलोमीटरचे अंतर बुलेट ट्रेन २ तासात पार करेल. चार स्थानकांवर ही ट्रेन थांबेल. मात्र जर ही ट्रेन सर्व १२ स्थानकांवर थांबली तर प्रवासाचा वेळ २ तास १७ मिनिटे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुलेट ट्रेनसाठी सुरत स्टेशनला दिलेल्या अलिकडच्या भेटीबद्दल रेल्वेमंत्री म्हणाले की, पंतप्रधान या प्रकल्पाच्या गतीबद्दल खूप समाधानी आहेत, असेही ते म्हणाले.
पुढील महिन्यात धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनची सेवा येत्या डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. तर काही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपरच्या पहिल्या आवृत्तीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना प्रवासादरम्यान अजिबात धक्का बसू नये याची खात्री करून त्याच्या जागा पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी बनवण्यात आल्या आहेत. हे साध्य करण्यासाठी, स्प्रिंग्ज आणि इतर घटकांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. जागतिक दर्जाचा, आरामदायी प्रवास अनुभव प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे.