

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख नुकतीच जाहीर केली आहे. 22 जुलैपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असुन हे अधिवेशन 12 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै दिवशी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. एनडीए सरकारच्या विनंतीवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्याची परवानगी दिली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली.
मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निवडणुकीच्या वर्षात फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळीच्या अर्थसंकल्पात एनडीए सरकारच्या विकसित भारत 3.0 च्या मिशनवर भर दिला जाईल, अशी शक्यता आहे.
या अर्थसंकल्पात एनडीए सरकारचे लक्ष कृषी क्षेत्र, रोजगार, भांडवली खर्चाचा वेग कायम राखणे आणि महसुलात वाढ यावर असेल. याव्यतिरिक्त, जीएसटी सुलभ करणे आणि कर नियमनाशी संबंधित ओझे कमी करणे हे देखील सरकारच्या अजेंड्यावर असेल. यासोबतच एनडीए सरकार आपल्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या अर्थसंकल्पात भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे चित्र मांडण्याची शक्यता आहे. तसेच चार राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा देण्यासारखे महत्वाचे पाऊलही उचलण्यात येणार आहे.
दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा होताच सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापली तयारी सुरू केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एनडीए सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक महागाई, नीट परीक्षा, हाथरसमधील घटना आणि मणिपूरमधील परिस्थितीवर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. त्याचवेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा हल्लाबोल रोखण्यासाठी सत्ताधारी रणनीती आखण्यात व्यस्त झाले आहेत. कारण विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधींचे सरकारवरील हल्ले अधिक तीव्र झाले आहेत.
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांची भाषणे आणि सभागृहातील त्यांच्या वागणुकीवरून भाजप अर्थसंकल्पीय अधिवेशनात हल्लाबोल करणार आहे. राहुल गांधींवर कारवाईची मागणी करत भाजप लोकसभा अध्यक्षांवर दबाव वाढवणार आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींच्या भाषणादरम्यान भाजपचे खासदारही घोषणाबाजी करण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या भाषणात सत्ताधारी लोकांकडून व्यत्यय आणण्याचीही दाट शक्यता आहे.