

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये गुरुवार-शुक्रवारच्या रात्री घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत सीमा सुरक्षा दलाने किमान सात दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. या कारवाईत पाकिस्तान रेंजर्सची एक पोस्टही उद्ध्वस्त करण्यात आली. एक बंकरही नष्ट करण्यात आला.
‘बीएसएफ’च्या प्रवक्त्याने सांगितले की, 8-9 मेच्या रात्री घुसखोरीचा प्रयत्न झाला, टेहळणी प्रणालीमुळे त्याची वेळीच माहिती मिळाली. ‘बीएसएफ’च्या जवानांनी संशयास्पद हालचाल पाहिली. हा घुसखोरीचा प्रयत्न पाकिस्तान रेंजर्सच्या धंधर पोस्टकडून गोळीबाराच्या आडून झाला, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले. जवानांनी तत्काळ प्रत्युत्तर देत 7 दहशतवाद्यांना ठार मारले आणि पाकिस्तानी पोस्टवरही जोरदार कारवाई केली. धंधर पोस्टवरील एक बंकर उद्ध्वस्त करण्यात आला, तसेच खूप मोठे सामरिक नुकसान केले, असेही त्यांनी सांगितले.
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी हल्ले जम्मू दिशेने वळले आहेत. नियंत्रण रेषेवर हलक्या शस्त्रांऐवजी तोफगोळ्यांचा वापर सुरू झाला आहे. विशेषतः पूंछ जिल्ह्यावर जोरदार तोफगोळ्यांचा मारा होत आहे. या कारवायांत 16 नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये पाच लहान मुले होती. अनेक रहिवासी घर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. गुरुवारी रात्री जम्मूच्या आकाशात अनेक ड्रोन व क्षेपणास्त्र अडवले गेले, त्यावेळी संपूर्ण परिसरात ‘ब्लॅकआऊट’ लागू करण्यात आले आणि सायरन वाजवले गेले.
भारताच्या प्रत्युत्तर कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व निमलष्करी दलांच्या प्रमुखांना ‘अलर्ट’ राहण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान व नेपाळ सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, सर्व वरिष्ठ अधिकार्यांना सीमावर्ती पोस्ट बळकट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रजेवर गेलेल्या सर्व जवानांना बोलावून घेण्यात आले असून, सतर्कता आणि संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठी आवश्यक तयारी सुरू आहे.