

दिल्ली: दिल्ली हायकोर्टापाठोपाठ मुंबई हायकोर्टाला आज (दि.१२) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या मेलमध्ये हायकोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनांमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असून, हायकोर्टाच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून, तपास सुरू आहे.
पहिल्यांदा दिल्ली उच्च न्यायालयाला ई-मेलवरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. या धमकीमुळे आज खटल्याची सुनावणी करण्यासाठी बसलेल्या अनेक बेंचना स्थगिती देण्यात आली. तर काही खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या न्यायालयाच्या परिसरात शोध घेतला जात असून, अद्याप बॉम्ब असल्याची पुष्टी झालेली नसल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
यानंतर काही वेळाने मुंबई उच्च न्यायालयाला देखीलएक धमकीचा ईमेल आला. हा ईमेल हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर आला आहे. यानंतर तत्काळ याची माहिती मुंबई पोलिस मुख्यनियंत्रण कक्षाला देण्यात आली आहे. यानंतर घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला कळवण्यात आले असून, सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई हायकोर्टाची इमारत रिकामी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.