

Bengaluru Blinkit Delivery Horror
बंगळूरु : पार्सल देताना ब्राझिलियन मॉडेलच्या विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्या ब्लिंकिट डिलिव्हरी एजंटला अटक करण्यात आली आहे. बंगळूरु येथे ही घटना १७ ऑक्टोबर रोजी घडली असून २५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, बंगळूर शहरात डिलिव्हरी एजंटकडून पार्सल देताना गैरवर्तनाची आणखी एक प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२१ वर्षीय ब्राझिलियन मॉडेल गेल्या दोन महिन्यांपासून एका खाजगी कंपनीत मॉडेल म्हणून काम करत आहे. संबंधित कंपनीने सुलतानपाल्य येथील एका फ्लॅटमध्ये तिची आणि अन्य दोन परदेशी नागरिकांना राहण्याची व्यवस्था केली होती. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता महिलेने ऑनलाइन किराणा सामान ऑर्डर केले. अर्धवेळ डिलिव्हरी एजंट म्हणून काम करणार कुमार राव पवार हा पार्सल घेवून पहिल्या मजल्यावरीलफ्लॅटवर पोहोचला. दाराची बेल वाजवली. महिलेने दार उघडताच पार्सल देण्याच्या बहाण्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. या घटनेने धक्का बसून तिने त्या पुरूषाला बाहेर ढकलले आणि दार बंद केले.
ब्राझिलियन मॉडेलने आपल्या सहकार्यांना या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. त्यांनी फ्लॅट मालकास या घटनेची माहिती दिली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, घटनेची पुष्टी केली आणि तक्रार दाखल केली. आम्हाला शनिवारी ब्राझिलियन मॉडेलकडून तक्रार मिळाली आणि काही तासांतच आम्ही आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. चौकशीदरम्यान कुमारने गुन्ह्याची कबुली दिली आहे. कुमार राव पवार हा एका खाजगी महाविद्यालयात शिक्षण घेत असून, अर्धवेळ डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याच्यावर त्याच्यावर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्याला एसीएमएम न्यायालयात हजर करण्यात आले आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, सध्या त्याची रवानगी परप्पाना अग्रहारा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.