

नवी दिल्ली : आपल्या शरीराला बळकटी देण्यासाठी हाडे निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. वाढते वय, चुकीचा आहार आणि शरीरातील कॅल्शियमसारख्या पोषक तत्त्वांची कमतरता, यामुळे अनेकदा हाडे कमकुवत होऊ लागतात. अशावेळी, त्यांना मजबुती देणे खूप महत्त्वाचे ठरते. त्यासाठी आहारात काळा मनुका समाविष्ट करणे गरजेचे आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
काळ्या मनुक्यामध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक हाडांना मजबुती देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यामध्ये बोरॉन नावाचे एक खनिज आढळते, जे हाडांमध्ये कॅल्शियमचे शोषण वाढवते. यामुळे हाडे लवकर कमकुवत होत नाहीत. काळ्या मनुक्यामध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात, जे शरीरातील सूज कमी करतात. यामुळे हाडे आणि सांध्यामध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात.