पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पार्टीचा पराभव करत तब्बल २७ वर्षानंतर सत्ता काबीज केली आहे. आता पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कॅगचा अहवाल सादर केला जाईल. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केली जाईल. घोटाळ्यांमध्ये सहभागी असलेल्यांना जबाबदार धरले जाईल, अशी माहिती दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दिली.
'पीटीआय'शी बोलताना सचदेवा म्हणाले की, "पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कॅगचा अहवाल सादर केला जाईल. सर्व भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आम्ही एक विशेष तपास पथक (एसआयटी) देखील स्थापन करू. दिल्लीतील मतदारांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. विकासासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे."
काँग्रेसच्या सलग तिसऱ्यांदा झालेल्या पराभवाबद्दल सचदेवा म्हणाले की, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पक्ष असूनही, त्यांना मोठी घसरण झाली आहे. त्यांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय नेतृत्वच स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.