हरियाणाच्‍या मुख्‍यमंत्रीपदी पुन्‍हा नायब सिंह सैनी? विजयादशमीला शपथविधीची शक्‍यता

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर सैनी पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Nayab Singh Saini
नायब सिंह सैनी. file photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हरियाणामध्ये भाजपला मोठा विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सैनी यांच्याकडेच येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच हरियाणामधील नव्या सरकारचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबरला होण्याचीही दाट शक्यता आहे. ११ ऑक्टोबरला भाजपच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.

हरियाणा भाजपचे नेतृत्त्‍व पुन्‍ह सैनीकडे जाण्‍याची शक्‍यता

मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी हरियाणा विधानसभेचे निकाल जाहीर झाले. ९० पैकी विक्रमी ४८ जागा भाजपने जिंकल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी भाजपला मिळाली. महत्वाचे म्हणजे आजवर राज्यात तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळणारा भाजप हा पहिला पक्ष आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. पुन्हा एकदा भाजप नेतृत्व आपले वजन सैनी यांच्या पारड्यात टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैनी हेच मुख्यमंत्री होतील, असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

'या' कारणास्‍तव सैनी पुन्हा होणार मुख्‍यमंत्री

काँग्रेसने जाट समाजावर लक्ष केंद्रित केल्यामुळे भाजपने जाटेतर समाजावर लक्ष केंद्रित केले. यामध्ये सैनी यांचा चेहरा लक्षवेधी ठरला. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस ओबीसी समाजाचा मुद्दा लावून धरत असताना भाजपने मनोहरलाल खट्टर यांच्या ठिकाणी सैनी यांच्या रूपाने ओबीसी मुख्यमंत्री दिला. भाजपने एक प्रकारे काँग्रेसला यातून उत्तरही दिले. भाजपच्या विजयात नायाब सिंह सैनी यांचा चेहरा देखील महत्त्वाचा घटक ठरल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अनिल विज यांच्या वाट्याला काय?

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल विज यांनी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता. आपण जेष्ठ आमदारांपैकी एक आहोत, त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री पद मिळायला हवे, आपण पक्षाकडे तशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अंबाला छावणी मतदारसंघातून ते पुन्हा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाकडून त्यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा विधानसभा अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये कोणतेही नेते जाहीरपणे कुठल्या पदाची मागणी करत नाहीत. तसे केल्यास नेत्यांना पक्ष नेतृत्वाने कानाडोळा केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे अनिल विज यांच्या बाबतीत काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news