

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा भाजपच्या सुशासनामुळे पक्षाला यश मिळत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्ष स्थापना दिनाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर व्यक्त होत पंतप्रधान म्हणाले की, 'गेल्या अनेक दशकांपासून आपल्या पक्षाला बळकटी देण्यासाठी ज्यांनी स्वतःला समर्पित केले त्या सर्वांची आपण आठवण करतो. हा महत्त्वाचा दिवस आपल्याला भारताच्या प्रगतीसाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या अतुलनीय वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.
भारतातील जनता आमच्या पक्षाचा सुशासनाचा अजेंडा पाहत आहे, जो गेल्या काही वर्षांत आम्हाला मिळालेल्या ऐतिहासिक जनादेशातूनही दिसून येतो. लोकसभा निवडणुका असोत, विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुका असोत किंवा देशभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत. आमची सरकारे समाजाची सेवा करत राहतील आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करतील, असेही ते म्हणाले.
कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पक्षाचे सर्व कार्यकर्ते जमिनीवर सक्रियपणे काम करतात. मला अभिमान आहे की आमचे कार्यकर्ते देशाच्या प्रत्येक भागात २४ तास काम करतात आणि गरीब, दलित आणि उपेक्षित लोकांची सेवा करत आहेत. त्याची ऊर्जा आणि उत्साह खरोखरच प्रेरणादायी आहे, असेही ते म्हणाले.