

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वडिल आणि माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देबेन्द्र प्रधान यांचे सोमवारी (दि. १७ मार्च) नवी दिल्ली येथे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. ते ओडिशा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी सकाळी १०. ३० च्या सुमारास राजधानी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते शारीरिक व्याधींशी झुंज देत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देबेंद्र प्रधान यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली. (Minister Dharmendra Pradhan's father passed away)
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले होते. दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण मांझी यांनी, देबेन्द्र प्रधान हे एक सुपसिद्ध नेते आणि उत्तम संसदपटू होते, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1999 ते 2001 या काळात ते केंद्रीय वाहतूक आणि कृषी मंत्री होते. खासदार आणि मंत्री असतानाच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक कामे केली. त्यांची त्यांचे संपूर्ण आयुष्य देशाच्या विकासासाठी घालवले. देशाने आणि राज्याने एक उत्तम समाजसेवक गमावला आहे, असेही माझी म्हणाले. माझी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्याशी बोलून त्यांचे सांत्वन केले.
ओडिशातील विरोधी पक्षनेते नवीन पटनाईक यांनीही देबेन्द्र प्रधान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशाने एक उत्कृष्ट राजकीय नेता गमावला आहे. त्यांचे अढळ व्यक्तिमत्व आणि संघटन कौशल्यासाठी ते नेहमी लक्षात राहतील.