पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदारांमधील अंतर्गत कलह सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील दोन खासदारांमधील वादाचा व्हॉट्सअॅप चॅटचा व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी याचा स्क्रीनशॉट शेअर करत तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि कीर्ती आझाद यांच्यात जोरदार वाद झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म Xवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तृणमूल काँग्रेसच्या खासदार बॅनर्जी आणि एका महिला खासदारामध्ये ४ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात वाद झाला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कल्याण बॅनर्जी आणि एका खासदारामध्ये या मुद्द्यावर जोरदार वाद झाला.
या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, माझ्यासह पक्षाचे अन्य खासदार निवेदन सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात गेले होते. त्यावेळी हा वाद झाला. त्यांनी यासाठी महिला खासदाराला जबाबदार धरले. ते म्हणाले की, मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. संबंधित महिला खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना मला अटक करण्यास सांगत होत्या. मला तुरुंगात पाठवणारे त्या कोण आहेत? त्यांनी मला शिवीगाळ केली. संसदेत लढणारा मी एकटाच आहे. मी फक्त एकाच विशिष्ट औद्योगिक घराण्याबद्दल वेड लावणारा माणूस नाही. महिला खासदाराला इंग्रजी भाषेत बोलता येते म्हणून ती कोणाचाही अपमान करू शकते असे नाही, असेही ते म्हणाले.
तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी पक्षाच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे तक्रार केली आहे. या वादानंतर महिला खासदाराने व्हॉट्सॲप ग्रुपही सोडला. त्यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना पत्रे पाठवून आपली तक्रार नोंदवली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर, कल्याण बॅनर्जी यांनी महिला खासदाराशी निवेदनावर स्वाक्षरी करण्यावरून वाद घातला. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले. महिला खासदाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली. यानंतर, खासदारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कल्याण बॅनर्जी आणि कीर्ती आझाद यांच्यात वाद झाला. बॅनर्जी यांनी असा दावा केला की कीर्ती आझाद यांनीच मला भडकावले आणि काय करावे याबद्दल व्याख्यान देत होते. त्यांनी व्हॉट्सॲप चॅट लीक केले आहे.
ज्येष्ठ तृणमूल काँग्रेस खासदार सौगत रॉय यांनी कल्याण बॅनर्जी यांच्यावर पक्षाची प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला आहे. रॉय म्हणाले की, कल्याण बॅनर्जी यांच्या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. कल्याण बॅनर्जी यांना तात्काळ मुख्य प्रतोद पदावरून काढून टाकावे. ते पक्षात सर्वांचा अपमान करतात तसेच गैरवर्तनही करतात. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे."