

नवी दिल्ली : भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, २० जानेवारी रोजी पक्षाच्या नव्या अध्यक्षांची अधिकृत घोषणा होणार आहे. अध्यक्षपदासाठी १९ जानेवारी रोजी नामांकन दाखल केले जाईल. आवश्यक असल्यास २० जानेवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे.
पक्षाच्यावतीने शुक्रवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली. या अधिसूचनेनुसार, १६ जानेवारी रोजी मतदारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. १९ जानेवारी रोजी अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले जाईल आणि आवश्यकता भासल्यास मंगळवार, २० जानेवारी रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होईल.
२० जानेवारी रोजी औपचारिक घोषणा
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान कार्याध्यक्ष नितीन नवीन हे एकमेव उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच विद्यमान पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा हे नितीन नवीन यांचे प्रस्तावक असू शकतात. एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केल्यास १९ जानेवारी रोजीच त्यांची निवड होईल. मात्र, नव्या अध्यक्षांची औपचारिक घोषणा २० जानेवारी रोजी केली जाणार आहे.
सर्व वरिष्ठ नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना
सूत्रांनुसार, भाजपशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय पदाधिकारी तसेच वरिष्ठ नेत्यांना अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाचे मुख्य निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण हे राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची औपचारिक घोषणा करतील. अध्यक्षपदासाठी तीन संचांमध्ये नामांकन दाखल केले जाणार असून, एका संचावर २० हून अधिक निवडून आलेल्या प्रदेशाध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या असतील.
डिसेंबरमध्ये कार्यकारी अध्यक्ष झाले नवीन
बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि पाच वेळा आमदार असलेले नितीन नवीन यांची डिसेंबरमध्ये भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या निवडीकडे पक्षात तरुण नेतृत्वाला चालना देण्याच्या दृष्टीने पाहिले जात आहे. कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी तामिळनाडू, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीत सक्रिय भूमिका घेतली आहे.
भाजप अध्यक्ष निवडीचे वेळापत्रक:
शुक्रवार, १६ जानेवारी २०२६
मतदार यादीचे प्रकाशन, दुपारी १२:००
सोमवार, १९ जानेवारी २०२६
नामांकन प्रक्रिया, दुपारी २:०० ते ४:००
नामांकन पत्रांची छाननी, दुपारी ४:०० ते ५:००
नामांकन मागे घेणे,दुपारी ५:०० ते ६:००
राष्ट्रीय निवडणूक अधिकाऱ्यांकडून निवेदन जारी करणे, संध्याकाळी ६:३०
मंगळवार, २० जानेवारी २०२६
मतदान (आवश्यक असल्यास) आणि अधिकृत घोषणा
सकाळी ११:३० ते १:३०