

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड एप्रिलमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या ६ एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. या दिवशीही भाजपला नवे अध्यक्ष मिळू शकतात. दरम्यान, १४ मार्चपर्यंत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडीला होणारा विलंब, संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक आणि हिंदू नववर्षाचे महत्त्व अशा विविध कारणांमुळे ही प्रक्रिया लांबली. रविवारी पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा झाला. यामध्ये पंतप्रधानांची सरसंघचालकांसोबत बैठक झाली. त्यामुळे भाजपच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग सुकर झाल्याचे समजते.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड तेव्हाच होऊ शकते जेव्हा देशात अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील. जेव्हा १८ राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका पुर्ण होतील तेव्हाच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होऊ शकेल. पुढच्या काहीच दिवसात या निवडी झालेल्या असतील. त्यामुळे लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल.
भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या स्थापनादिनी नव्या अध्यक्षांची घोषणा होऊ शकते. असे करायचे झाल्यास भाजपाला विविध राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी लागेल. मात्र भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची बैठक १० किंवा १२ एप्रिलला पक्ष मुख्यालयात होणार होती. आधीच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार या बैठकीत अध्यक्षांच्या नावाचा प्रस्ताव मांडून निर्णय होऊ शकणार होता. त्यामुळे ६ एप्रिलला म्हणजेच पक्षस्थापना दिनाच्या दिवशी जर निर्णय घ्यायचा असेल तर ही बैठक देखील भाजपला त्याआधी घ्यावी लागणार आहे.
भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र यादव, जी. किशन रेड्डी अशी काही प्रमुख नावे चर्चेत आहेत. मात्र यामध्ये शिवराज सिंह चव्हाण यांचे नाव सर्वात पुढे आहे आणि त्यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही समर्थन आहे. शिवराज सिंह चव्हाण संघ आणि सरकार यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करू शकतात, ही त्यांची जमेची बाजू आहे. दक्षिणेतून विचार केला तर जी. किशन रेड्डी यांचे नाव पुढे येऊ शकते मात्र उत्तरेतून विचार केला किंवा पंतप्रधान मोदींच्या मर्जीनुसार निवड झाली तर मनोहरलाल खट्टर यांची निवड होऊ शकते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रभारी राहिलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याही नावाची चर्चा या पदासाठी आहे. ते अमित शाह यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात.