

नवी दिल्ली : दिल्लीतील इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार करावे, अशी मागणी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासाठी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहीले आहे. इंडिया गेटचे नाव बदलणे ही देशातील दहा हजार हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सिद्दीकींनी म्हटले आहे.
जमाल सिद्दीकी यांनी पंतप्रधान मोदींना पत्रात म्हटले आहे की, तुमच्या नेतृत्वात १४० कोटी भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृतीच्या प्रति प्रेम आणि समर्पण भावना वाढली आहे. तुम्ही क्रूर मुघलांच्या नावाने बांधलेल्या औरंगजेब रोडचे नाव डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रोड असे ठेवले. इंडिया गेटवरील पंचम जॉर्ज यांचा पुतळा हटवून त्याजागी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात आला. राजपथाचे नामकरण कर्तव्य पथ असे करण्यात आले. तसेच इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार असे करण्यात यावे, असे सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
इंडिया गेट हे राजधानी दिल्लीत बांधलेले युद्ध स्मारक आहे. पहिल्या महायुद्धात आणि अफगाण युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ हे बांधण्यात आले आहे. १९१४-१९२१ च्या पहिल्या महायुद्धात आणि तिसऱ्या अफगाण युद्धात ७० हजारांहून अधिक भारतीय सैनिक शहीद झाले. इंडिया गेटवर १३ हजार ५१६ सैनिकांची नावे कोरलेली आहेत. इंडिया गेटचे बांधकाम १९२१ मध्ये सुरू झाले आणि १९३१ मध्ये पूर्ण झाले होते. ब्रिटीश वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स यांनी त्याची रचना केली होती. इंडिया गेटची उंची ४२ मीटर आहे.