

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
भाजपने नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची तयारी सुरू केली आहे. या संदर्भात शनिवारी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली संघटनेशी संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, बी. एल. संतोष, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश प्रभारी आणि सरचिटणीस सहभागी झाले होते. या बैठकीत पक्षाच्या सदस्यत्व नोंदणी अभियानाला सुरूवात करण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला. भाजपच्या सदस्यत्व नोंदणी अभियानाच्या राष्ट्रीय समन्वयक पदी विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीत भाजपच्या या सदस्यत्व नोंदणी अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक विनोद तावडे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीनंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, पक्ष आपले 'प्राथमिक राष्ट्रीय सदस्यत्व' अभियान दोन टप्प्यात चालवेल. पहिल्या टप्प्यात १ ते २५ सप्टेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत अभियान राबविण्यात येणार आहे. १० कोटी लोकांना भाजपचे सदस्य बनवण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. यानंतर, पक्ष १६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान 'सक्रिय सदस्यत्व अभियान' राबवेल आणि १ ते १० नोव्हेंबर दरम्यान प्राथमिक आणि सक्रिय सदस्यांचे सदस्यत्व आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकांनंतर भाजप अध्यक्षांची निवड होणार आहे. यावरून भाजप अध्यक्षपदाची निवडणूक जानेवारी २०२५ पूर्वी होणार नसल्याचे स्पष्ट होते. या अभियानासाठी केंद्रीय नेते राज्यांचा दौरा करणार आहेत. या बैठकीत अमित शाह म्हणाले की, आमचे नेते राजकीय फायद्यासाठी काम करणार नाहीत.
भाजपच्या घटनेच्या कलम १९ नुसार पक्षाच्या अध्यक्षाची निवड केली जाईल. ही निवडणूक राष्ट्रीय कार्यकारिणीने ठरवून दिलेल्या नियमांनुसार घेतली जाईल, असे पक्षाच्या घटनेत नमूद केले आहे. भाजपच्या घटनेनुसार, किमान ५०% म्हणजे अर्ध्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाऊ शकतो.
महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये भाजपचे सदस्यत्व नोंदणी अभियान होणार नाही. संबित पात्रा म्हणाले की, विधानसभा निवडणूका असलेल्या राज्यांमध्ये अभियान चालवले जाणार नाही. उर्वरित सर्व राज्यांमध्ये ते चालवले जाईल.