नवी दिल्ली : भाजप नेते असलेल्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मते बाबासाहेबांचे संविधान दाखवून जात जनगणनेसाठी आवाज उठवणे ही नक्षलवादी कल्पना आहे. भाजपची ही विचारसरणी म्हणजे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यघटनेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी झाली आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी दाखवत असलेल्या लाल संविधानावरून टीका केली होती. त्याला राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
सोशल मीडियावर व्यक्त होत राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने संविधानासाठी लढून महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवून दिला. महाराष्ट्रातील जनता भाजपकडून होणारा बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही. महाराष्ट्रातील नागरिक काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहत आपल्या संविधानावरील प्रत्येक हल्ल्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊन त्याचे रक्षण करतील. आणि भाजपचे असे सर्व लाजिरवाणे प्रयत्न अयशस्वी होतील, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच 'लिहून घ्या, जातनिहाय जनगणना होईलच,' असेही ते म्हणाले.
देशात ८ वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी लागू केली. यानिमित्त लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर व्यक्त होत राहुल गांधी म्हणाले की, नोटाबंदीनंतर लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगासह विविध क्षेत्र नष्ट होऊन मक्तेदारीला चालना मिळाली. ८ वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज भारतात जास्त रोकड वापरली जात आहे. राहुल गांधी म्हणाले की, व्यवसायांसाठी भीतीचे वातावरण निर्माण करणारी अकार्यक्षम आणि चुकीची धोरणे भारताची आर्थिक क्षमता नष्ट करतील. राहुल गांधींनी एक तक्ताही शेअर केला आहे.