

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी विधानसभेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये दिल्लीत ५० हजार अतिरिक्त कॅमेरे बसवले जातील, गर्भवती महिलांना एकुण २१० कोटी रुपये दिले जातील, दिल्लीतील नागरिकांना आता लोकांना १० लाख रुपयांचा विमा मिळेल, अशा अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. २७ वर्षांनंतर दिल्लीतील भाजप सरकारने सादर केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. याबाबत रेखा गुप्ता म्हणाल्या की, या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा, वाहतूक आणि प्रदूषण नियंत्रण यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मागील सरकारने खुप मोठे बजेट ठेवले होते मात्र झोपडपट्टीवासीयांसाठी कोणतीही योजना आखली नाही, कोणतेही काम केले नाही. त्यांचे जीवन दिवसेंदिवस वाईट होत चालले होते. मागील सरकारने प्रधानमंत्री आवास योजना लागू करू दिली नाही आणि कोणालाही त्याचा लाभ घेऊ दिला नाही. आता दिल्ली सरकार प्रधानमंत्री आवास योजना राबवेल. यामध्ये २० कोटी रुपये वाटप केले जातील. विकासकामांसाठी पूर्ण आमदार निधी उपलब्ध असेल, असेही रेखा गुप्ता म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे बजेट केवळ रस्ते, पूल आणि कॉरिडॉर बांधण्यासाठी नाही तर संपूर्ण दिल्लीची स्थिती सुधारण्यासाठी आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल करत त्या म्हणाल्या की, तुम्ही शीशमहाल बांधला, आम्ही मात्र गरिबांसाठी घरे बांधणार आहोत. मागील सरकारने फक्त घोषणा केल्या आणि आम्ही आमची आश्वासने पूर्ण करतो.
· दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जातील.
· गर्भवती महिलांना एकुण २१० कोटी रुपये दिले जातील.
· आता लोकांना १० लाख रुपयांचा विमा मिळेल.
· जन आरोग्य योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचा अतिरिक्त विमा उपलब्ध असेल.
· ५० हजार अतिरिक्त कॅमेरे बसवले जातील.
· कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी १ हजार कोटी रुपये दिले जातील.
· १०० ठिकाणी अटल कॅन्टीन असेल. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद. ५ रुपयांना थाळी मिळेल.
· दिल्लीतील रस्ते सुधारण्यासाठी ३८०० कोटी रुपये खर्च केले जातील.
· झोपडपट्टी वसाहतींच्या विकासासाठी ६९६ कोटी रुपये दिले जातील.
· दिल्लीत एक नवीन औद्योगिक आणि गोदाम धोरण आणले जाईल.
· ज्येष्ठ नागरिकांना चार प्रलंबित अनुदाने दिली जातील, २० कोटी रुपयांचे अनुदान असेल.