

PM Modi Post Controversy
नवी दिल्ली : काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर शेअर केलेल्या 'गायब' पोस्टवरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका करताना या पोस्टला "देशविघातक" आणि "दुष्ट हेतूने प्रेरित" असे संबोधले आहे.
दरम्यान, "काँग्रेस आता देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलत आहे. जर आम्ही त्यांना 'लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस' म्हणालो, तर ते चुकीचं ठरणार नाही. काँग्रेसने जो फोटो पोस्ट केला, तो पाकिस्तानला संकेत देतो की भारतात मीर जाफरचे समर्थक म्हणजेच देशद्रोही अजूनही आहेत."
ते पुढे म्हणाले, "'सर तन से जुदा' ही आजच्या काँग्रेसची – ‘लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस’ – ची विचारधारा बनली आहे. राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार असे पोस्ट टाकले जातात, जे देशाची मान खाली घालवणारे असतात."
भाजपने या प्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत म्हटले की, "या प्रकारामुळे पाकिस्तानला संदेश दिला जात आहे की काँग्रेस पक्ष भारताच्या बाजूने नाही, तर पाकिस्तानच्या बाजूने उभा आहे." काँग्रेसच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावरही चांगलाच गदारोळ निर्माण झाला असून, अनेक भाजप समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काँग्रेस पक्षाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये मोठ्या अक्षरात फक्त एकच शब्द लिहिला होता, "गायब" या फोटोमधून काँग्रेसने असा संदेश द्यायचा प्रयत्न केला की पंतप्रधान मोदी एका गंभीर परिस्थितीत कुठेही दिसत नाहीत, म्हणजेच ते "गायब" आहेत. ही पोस्ट एकप्रकारे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारी होती.
भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी असा आरोप केला की, काँग्रेसने 'गायब' या एका शब्दाच्या माध्यमातून पंतप्रधानांवर टीका केली, पण त्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया देत त्याला देशविरोधी, पाकिस्तान समर्थक विचारसरणीचा भाग असे म्हटले. त्यामुळे हे प्रकरण सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच गाजत आहे.