

BJP on Election Commission controversy
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपने आज (दि. २३) पलटवार केला. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधक निवडणूक आयोगासह घटनात्मक संस्थांवर आरोप करत असल्याचा दावा भाजपने केला. निवडणूक आयोगाच्या तीनही सदस्यांमध्ये चर्चा आणि मतांची देवाणघेवाण होणे ही लोकशाही प्रक्रियेचाच भाग असल्याचेही भाजपने म्हटले आहे.
नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर विरोधी पक्षांना सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. जनतेने निवडून न दिल्यानंतर लोकशाही पद्धतीने पराभव स्वीकारण्याऐवजी विरोधक घटनात्मक संस्थांवर हल्ले करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर पात्रा यांनी आयोगाच्या भूमिकेचा संदर्भ दिला. ‘मी निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेत नाही. मात्र, आयोगाने जारी केलेले निवेदन माझ्याकडे आहे,’ असे ते म्हणाले. आयोगाने निर्णय घेताना तीनही आयुक्तांमध्ये चर्चा होत असल्याचे आणि निर्णय एकमताने घेतले जात असल्याचे स्पष्ट केले आहे, असे पात्रा यांनी सांगितले.
मतदारयादीतून नावे वगळून भाजपला फायदा करून दिल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर पात्रा यांनी पश्चिम बंगालचा दाखला दिला. त्यांच्या दाव्यानुसार, बंगालमधील ज्या २० विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदारांची नावे वगळण्यात आली, त्यापैकी १३ मतदारसंघांत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा विजय झाला. भाजपला सहा जागा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांना निवडणुकीत विजय मिळवता येणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी घटनात्मक संस्थांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचा आरोप पात्रा यांनी केला. मात्र, बंगालमधील मतदारांची नावे वगळणे आणि निवडणूक निकाल यांच्यात थेट संबंध असल्याचा स्वतंत्र निष्कर्ष त्यांनी सादर केलेला नाही.
‘देशात निवडणुका घेणारे तीन निवडणूक आयुक्त एकमेकांशी चर्चा करत नसतील, विचारांची देवाणघेवाण करत नसतील तर विरोधक त्याला हुकूमशाही म्हणतात. तीनही आयुक्तांमध्ये चर्चा होत असेल तर त्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत,’ असे पात्रा म्हणाले.