नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्र लिहिले होते. त्याचे उत्तर म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज (दि.१९) मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. राहुल गांधी म्हणजे पुन्हा लॉन्च करण्यासाठी पॉलिश केलेले "अयशस्वी उत्पादन" असा हल्लाबोल नड्डा यांनी पत्रात केला आहे. अनेक वर्षांपासून राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदींविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली, त्याकडे खर्गे यांनी डोळेझाक केली. असा आरोप नड्डा यांनी पत्रात केला आहे.
पंतप्रधानांविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरणाऱ्या, ज्यांच्या ढासळलेल्या मानसिकतेमुळे संपूर्ण देशाचा भडका उडाला, अशा व्यक्तीला तुम्ही कोणत्या विवंचनेतून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहात? माहिती आहे का?, असे सवाल भाजप अध्यक्ष नड्डा यांनी केले आहे.स्वतंत्र भारतात कोणत्याही नेत्याचा अपमान झाला नाही. जितका तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधानांचा अपमान केला आहे. एखाद्या नेत्याने पंतप्रधानांच्या विरोधात जितके उपहासात्मक शब्द वापरले तितकेच त्याला पदोन्नती देण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसवर त्यांनी केला. मी याची उदाहरणे द्यायला सुरुवात केली तर मला एक पुस्तक लिहावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
तुम्हाला राहुल गांधींचा कशाचा अभिमान आहे? ते भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक लोकांना आलिंगन देतात. ते देशविरोधी शक्तींना पाठिंबा मागतात. इतर राष्ट्रांना भारतीय लोकशाहीत ढवळाढवळ करण्याची विनंती करतात. ते समाजात फूट पाडण्यासाठी जाती आणि आरक्षणावर बोलतात. परदेशात जाऊन मागास, दलित, आदिवासींचे आरक्षण संपवण्याची चर्चा करतात. ते जम्मू-काश्मीरमधील शांततेविरुद्ध विष पेरतात. पाकिस्तानशी चर्चा, व्यापार आणि कलम ३७० पुनर्स्थापित करण्याची शिफारस करतो. सनातनी हिंदू संस्कृतीचा अपमान करतात. म्हणून तुम्हाला त्यांचा अभिमान वाटतो का? असा जोरदार हल्लाबोलही जे. पी. नड्डांनी पत्रातून केला आहे.
राहुल गांधींनी लष्कराच्या जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शीखांच्या पगडीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोपही त्यांनी केला. नड्डा यांनी आपल्या पत्रात राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते सॅम पित्रोदा, इम्रान मसूद, शशी थरूर, दिग्विजय सिंग, पी. चिदंबरम आणि सुशील कुमार शिंदे यांच्यावर देशाची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडली नसल्याचा आरोप केला आहे. ते पुढे म्हणाले की, देशाचे उत्तर-दक्षिण विभाजन करणे हा काँग्रेसचा स्वभाव बनला आहे. त्यांच्या सभांमध्ये “पाकिस्तान झिंदाबाद”च्या घोषणा दिल्या जात होत्या. ते म्हणाले की, काँग्रेस हाच पक्ष आहे ज्याने आणीबाणी लादली, तिहेरी तलाकचे समर्थन केले आणि घटनात्मक संस्थांची बदनामी केली, असेही नड्डा यांनी पत्रात म्हटले आहे.