

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित बोफोर्स गैरव्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बोफोर्स प्रकरणाबाबत चित्रा सुब्रमण्यम यांच्या अलीकडेच प्रकाशित पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे आहेत, असे म्हणत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधींनी राजीनामा देण्याची मागणी भाजपने केली. भ्रष्टाचार, दलाली हे काँग्रेसचे काम आहे आणि के सर्वश्रुत आहे, असा हल्लाही भाजपने चढवला.
ओटाव्हियो क्वात्रोची नावाच्या व्यक्तीशी गांधी कुटुंबाच्या संबंधांचा खुलासा करावा, तसे न केल्यास राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी त्यांच्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी (दि.२५) पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. भाटिया म्हणाले की, लेखिका चित्रा सुब्रमण्यम यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले. त्या पुस्तकात समोर आलेली तथ्ये अत्यंत चिंताजनक आहेत. यातून हे स्पष्ट होते की, राजीव गांधी, सोनिया गांधी ही लोक दलालीत गुंतलेले होते. बोफोर्स प्रकरण राजीव गांधी आणि सोनिया गांधींच्या प्रतिष्ठेवर लागलेला डाग आहे जो कधीही पुसला जाणार नाही, असेही ते म्हणाले.
पुस्तकाचा संदर्भ देत गौरव भाटिया म्हणाले की, भाजप पुस्तकातून समोर आलेल्या तथ्यांवर काही प्रश्न उपस्थित करू इच्छित आहे. बोफोर्स गैरव्यवहारात ओटाव्हियो क्वात्रोची यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी जवळचे संबंध होते आणि त्यातून ते कंपन्यांसाठी सरकारी कंत्राटे मिळवू शकले, असा दावा केला. तसेच तत्कालीन पंतप्रधानांच्या आधीही क्वात्रोचीकडे प्रमुख संरक्षण करारांशी संबंधित गोपनीय सरकारी कागदपत्रांची माहिती होती. राजीव गांधींच्या कार्यकाळात क्वात्रोचीने विशिष्ट कंपन्यांच्या बाजूने कंत्राटे मिळवली असून राजीव गांधींनी यासाठी मदत केली, असेही भाटिया म्हणाले.
भाटिया यांनी सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांना प्रश्न विचारला की क्वात्रोचीला संवेदनशील कागदपत्रे का पाठवली जात होती. भारतात अशा लोकांचे काम काय होते? काँग्रेस नेत्यांनी यासंबंधीची उत्तरे द्यावीत अन्यथा त्यांच्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच भाटियांनी दावा केला की, १९८४ ते १९८८ दरम्यान इटलीतील भारतीय राजदूतांनी म्हटले आहे की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे क्वात्रोची कुटुंबाशी खूप जवळचे संबंध होते आणि तेच या गैरव्यवहाराचे सूत्रधार होते. याशिवाय, तत्कालीन कॅगच्या अहवालात बोफोर्स तोफांच्या खरेदी मूल्यांकनात गंभीर त्रुटी होत्या, असे म्हटले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.