

नवी दिल्ली : संसदेत जे झाले तसे मी कधीच पाहिले नाही. आमच्या खासदारांमध्ये राहुल गांधी जबरदस्तीने शिरले. ते मुद्दाम मकरद्वारमधून गेले. काँग्रेसचे खासदार दुसऱ्या दारातून जाऊ शकले असते. काँग्रेसचे कृत्य अत्यंत चुकीचे होते. काँग्रेसने आपल्या कृत्यांसाठी माफी मागावी,’ असे म्हणत संसदेतील गोंधळावरून केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. अनेक वर्षे मी राजकारणात सभागृहात आहे. मात्र असा प्रकार कधीच पाहिला नाही, असेही ते म्हणाले.
संसदेत झालेल्या गोंधळावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, राहुल गांधी यांनी मुद्दाम भाजप खासदारांमध्ये शिरून धक्काबुक्की केली. या घटनेत भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी झाले. त्यामुळे काँग्रेसने आपल्या कृत्यांबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आणि काँग्रेसच्या पत्रकार परिषदेतही त्यांचा उद्दामपणा दिसून आल्याचे चौहान म्हणाले.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, म्हणाले, मी अनेक वेळा लोकसभा आणि विधानसभेचा सदस्य झालो. खासदार-आमदारांची वागणूक मी पाहिली आहे. मात्र बुधवारी संसदेत जे घडले ते अनपेक्षित आहे आणि कल्पनेच्या पलीकडचे आहे. ज्याची सुसंस्कृत समाज कल्पनाही करू शकत नाही. काँग्रेसची वागणूक असभ्य आणि गुंडगिरीसारखी होती, खासदारांना कोणत्याही गोष्टीवर आपला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. काँग्रेसही अनेक दिवस आंदोलन करत होती, त्यांचे खासदार मकरद्वार येथे गोळा व्हायचे. त्यामुळे आम्ही इतर दारातून किंवा जवळच्या जागेतून शांतपणे आत जात होतो. बुधवारी मकरद्वारावर भाजपचे खासदार आंदोलन करत असताना राहुल गांधी आले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना जाण्यासाठी बाजूच्या जागेचा वापर करण्यास सांगितले. मात्र जाणीवपूर्वक राहुल गांधी आमच्या खासदारांमध्ये पोहोचले आणि त्यांनी केवळ हस्तक्षेप केला नाही तर धक्काबुक्की आणि गुंडगिरी केली. आमचे खासदार प्रताप सारंगी पडले आणि त्यांना दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
'काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत शिवराज सिंह चौहान म्हणाले की, त्यांनी पत्रकार परिषद का घेतली हेच समजू शकले नाही. दरम्यान, त्या पत्रकार परिषदेतही त्यांचा उद्दामपणा दिसून आला. संसदेत काँग्रेसने केलेल्या चुकीची माफी मागितली मात्र त्यांनी माफी मागितली नाही, असेही ते म्हणाले.