

पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत महिला उद्योजकांऐवजी पुरुषांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने केलेल्या या वाटपात मोठा गोंधळ झाल्याचा आरोप होत असून नितीश कुमार सरकारने आता या प्रकरणाच्या उƒस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जीविका समूहाशी संबंधित महिलांना स्वयंरोजगारासाठी हे पैसे दिले जाणार होते. मात्र दरभंगा जिल्ह्यातील जाले ब्लॉकसह अनेक ठिकाणी महिलांऐवजी पुरुषांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. ज्या पुरुषांच्या खात्यात पैसे आले आहेत, त्यांना आता प्रशासनाने नोटीस बजावून पैसे परत करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकांनी हे पैसे खर्च केले असल्याचे सांगून ते परत करण्यास असमर्थता दर्शवली आहे.
निवडणुकीपूर्वी मते मिळवण्यासाठी घाईत हे पैसे वाटण्यात आले, असा आरोप मुख्य विरोधी पक्ष असलेल्या आरजेडीने केला आहे. आरजेडीने पुराव्यादाखल प्रशासनाने लाभार्थ्यांना पाठवलेली पत्रेही समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली आहेत. केवळ मते खरेदी करण्यासाठी नियमांना बगल देऊन हे पैसे वाटण्यात आले, असे विरोधकांनी म्हटले आहे.
बिहारचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, प्रक्रियेत काही तांत्रिक चुका झाल्या असण्याची शक्यता आहे. मी अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.