

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचा अजेंडा हा मुस्लिम लीग आणि माओवादाभोवती फिरत आहे. त्यामुळे आजची काँग्रेस मुस्लिम लीग, माओवादी काँग्रेस (एमएमएस) बनली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. वेगळा अजेंडा असलेल्या काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठी फूट पडू शकते, असे भाकीतही त्यांनी केले. बिहार विधानसभा निवडणुकीतील एनडीएच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप मुख्यालयामध्ये उपस्थितांना ते संबोधित करत होते.
यावेळी त्यांनी काँग्रेस, राजद यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच ऐतिहासिक विजयाबद्दल भाजप आणि एनडीएच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. बिहार जिंकल्यानंतर आता प. बंगालही जिंकणार, तेथील जंगलराजही संपविणार, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना इशारा दिला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज काँग्रेस एमएमसी - मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस बनली आहे. काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा आता याचभोवती फिरतो. म्हणूनच काँग्रेसमध्येही एक वेगळा गट उदयास येणार आहे, जो या नकारात्मक राजकारणामुळे अस्वस्थ आहे. हा गट काँग्रेसच्या नामदारांच्या विरोधात आहे. या गटामध्ये तीव्र निराशा वाढत आहे. भविष्यात काँग्रेसमध्ये आणखी एक मोठी फूट पडू शकते. काँग्रेसच्या मित्रपक्षांनाही आता हे समजत आहे की, काँग्रेस सर्वांना नकारात्मक राजकारणात बुडवत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी काँग्रेसच्या मित्रपक्षांना आधीच सांगितले आहे की, काँग्रेस हा एक परजीवी आहे. जो त्यांच्या मित्रपक्षांची व्होट बँक गिळंकृत करून पुनरागमन करू इच्छितो. म्हणून त्यांनाही काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे. बिहारमध्ये राजद अडचणीत आहे. काँग्रेस-राजद वाद लवकरच समोर येईल, असा दावा त्यांनी केला.
बिहारमध्ये जंगलराज आणि कट्टा सरकार पुन्हा येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लोकांनी विकसित आणि समृद्ध बिहारसाठी मतदान केले आहे. जामिनावर असलेल्यांना जनता साथ देत नाही, हे बिहारने दाखवून दिले, असे म्हणत मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालुप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला छटी मैयाचा जयजयकार केला. बिहारच्या लोकांनी गर्दा उडवला, असे ते म्हणाले. या अगोदर मंचावर येताच बिहारी पद्धतीने गमछा उडवत पंतप्रधानांनी विजयाचा जल्लोष व्यक्त केला. यावेळी त्यांनी एनडीएच्या सर्व घटक पक्षांतर्फे बिहारच्या जनतेचे आभार त्यांनी मानले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोखंडच लोखंडाला कापते, अशी म्हण आहे. बिहारमधील काही घटक पक्षांनी एमवाय अर्थात माय (मुस्लिम आणि यादव) फॉर्म्युला बनवला होता. आजच्या विजयाने नवीन सकारात्मक एमवाय अर्थात माय फॉर्म्युला दिला. हा फॉर्म्युला म्हणजे महिला आणि युवक होय, असे ते म्हणाले.
आज फक्त एनडीएचा विजय नाही तर लोकशाहीचाही विजय झाला आहे. भारताच्या लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्याचा हा विजय आहे. या निवडणुकीत निवडणूक आयोगावरील जनतेच्या विœासाला आणखी ‘जबूत केले, असे पंतप्रधान म्हणाले.
मतदार यादीच्या सुधारणेला युवक खूप गंभीरतेने घेतात. बिहारमध्ये युवकांनी मतदार यादी सुधारणेचे समर्थन केले. लोकशाहीच्या पावित्र्यासाठी प्रत्येक मतदाराची किंमत आणि हक्क महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे दायित्व बनते की, मतदार यादी सुधारणा प्रक्रियेसाठी बूथ स्तरावर आपापल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करावे. मतदार यादीच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये सर्व पक्षांनी योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.