

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज (दि. २०) सभागृहात मोबाईल फोन वापरावरुन जोरदार खडाजंगी झाली. सभागृहामध्ये मोबाईल फोनच्या अतिवापरावरुन मुख्यमंत्री नितीश कुमार चांगलेच भडकले. तसेच सभागृहामध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यादव यांच्याकडे केली. तसेच सभागृहात मोबाईल फोन घेवून येणार्यांना बाहेर काढा, असा आग्रहही त्यांनी धरला. तसेच यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानावर सभागृहात हशा पिकला.
सभागृहात सदस्य कृष्ण कुमार मोहन हे त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर पाहत आपला मुद्दा मांडत होते. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, "तुम्ही तुमचे विचार सभागृहात मांडले पाहिजेत, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनकडे पाहून बोलता का?, आजकाल सगळेच मोबाईलवर बोलत आहेत. हे बोलण्यासारखे आहे का? असे सवाल त्यानी विधानसभा अध्यक्षांना केले.
यावेळ मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, " गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सारेच मोबाईल फोनवर आहेत. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर १० वर्षांत पृथ्वी नष्ट होईल. पूर्वी मीही मोबाईल फोन खूप पाहायचो; पण २०१९ मध्ये, जेव्हा मला कळले की यामुळे जगाचा नाश होईल, तेव्हा मी ते सोडून दिले.कोणी मोबाईल फोन सभागृहात आणला तर तो फेकून द्या. मुख्यमंत्री नितीश यांनी विरोधी आमदाराला बसण्यास सांगितले. तुम्ही तुमच्या मोबाईलकडे पाहत हे वाचत आहात का? हे हानिकारक आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. नितीश कुमार यांच्या विधानांवर सभागृहात हशा पिकला.
यापूर्वी नितीश कुमार यांनी बांका येथील एका खुल्या व्यासपीठावरून मोबाईल फोनचा वापर कमी करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला होता. अमरपूर येथील लोकसभा निवडणुकीच्या सभेत त्यांनी म्हटलं होतं की, "पूर्वी मोबाईल फोनचा वापर खूप कमी होता. आता तो इतका वाढला आहे की लवकरच पृथ्वी नष्ट होईल."