पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथील निवास डॉक्टरांचे आंदोलनचा प्रश्न शनिवारी (दि. १४ सप्टेंबर) झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व मागण्या मान्य करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर झालेल्या बैठकीत आंदोलन मागे घेण्यावर एकमत झालं होते. यानंतर निवास डॉक्टरांनी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी असलेल्या बैठकीत गेले होते. यावेळी निवास डॉक्टरांनी या बैठकीचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची मागणी केली होती. परंतु, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने लाइव्ह स्ट्रीमिंगला परवानगी देता येणार नाही, असे मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या. त्यामुळे आंदोलक डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानावरुन बाजू घेत बाहेर पडले. त्यामुळे ही बैठकसुद्धा अपयशी ठरली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (दि. १४) आरोग्य भवन येथे आंदोलन करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर डॉक्टरांनी बंगाल सरकारला एक मेल पाठवला होता, ज्यामध्ये त्यांनी ममता बॅनर्जींना भेटून हा गोंधळ दूर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ममता बॅनर्जी यांनी सायंकाळी सहा वाजता डॉक्टरांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावले होते.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमधील प्रक्षिणार्थी महिला डॉक्टरावर ९ ऑगस्ट रोजी बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाहोता. या घटनेने वैद्यकीय महाविद्यालयात एकच खळबळ उडाली. अवघ्या काही तासांमध्ये या घटनेबाबत देशभरात संतापाची लाट उसळली. सर्वत्र सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी आंदोलन करत पीडितेला न्याय आणि डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत ठोस कायदा करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली होती. तसेच कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणचा तपास करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले होते. नुकत्याच झालेल्या सुनाणवीत सर्वोच्च न्यायालयाने तपासाचा नवीन अहवाल सादर करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत.