

पालघर : छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. मालवणमध्ये जी घटना घडली, त्याबद्दल मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.
वाढवण बंदराचे भूमिपूजन तसेच दिघी पोर्ट आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अशा प्रकल्पांचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी मोदी यांनी सुरुवातीला मालवणमधील घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी केवळ राजे-महाराजे नाहीत; तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मालवणमधील घटना वेदनादायी आहे. त्याबद्दल मी शिवाजी महाराजांच्या चरणी माथा टेकून माफी मागतो. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा झाली तेव्हा पहिल्यांदा मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी रायगडावर आलो होतो, अशी आठवणही मोदी यांनी यावेळी सांगितली. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य विकासमंत्री राजीव रंजन सिंह, बंदर व जल वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालघरचे मंत्री रवींद्र चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, वाढवण बंदराचा प्रारंभ ही महाराष्ट्राच्या विकास यात्रेची सुरुवात आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, 76 हजार कोटींचे हे बंदर जल वाहतूक क्षेत्रात जगात नवक्रांती घडवेल. वाढवणबरोबरच दिघी पोर्ट आणि दिघी दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर या भागाचा कायापालट करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदी म्हणाले, भारताची नवी पिढीच नवा भारत घडवेल. या पिढीचे भवितव्य घडविण्यासाठी अभूतपूर्व विकासाला गती देण्याचे काम आम्ही केले आहे. आम्ही जलमार्गाचा विकास केला. तरुणांना रोजगार देण्याचे काम केले. भारताच्या विकासाला नवी दिशा, नवी आशा आम्ही दिली. उद्योग, व्यापार वाढावा म्हणून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. जगात सर्वोत्तम बंदर वाढवण बंदर होईल. कारण या बंदराची खोली 20 मीटरपेक्षा जास्त असल्याचा फायदा आपल्याला मिळेल. या बंदराला रेल्वे आणि महामार्गाची कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. दिल्ली- मुंबई एक्स्प्रेस वे, मुंबई - नागपूर एक्स्प्रेस वे हे प्रकल्प वाढवणला जोडले जातील. सर्वात मोठे कार्गो जहाज या बंदरात लागेल. महाराष्ट्राचा विकास हे माझे प्राधान्य आहे.
आत्मनिर्भर भारतात केंद्राच्या अनेक योजनांचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होत आहे. मात्र विरोधी पक्ष विकासकामांत अडथळे आणतात. वाढवण बंदराला विरोध करणारे विरोधक विकासाला विरोध करत आहेत, असा हल्ला मोदी यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केला. अनेक विकासकामे राज्यातील विरोधक सुरू होऊ देत नाहीत. महाराष्ट्राचा खरा विकास 2014 ला देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर सुरू झाल. यापूर्वी विकासाची कामे का झाली नव्हती, असा सवाल करत मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासकामांतून 12 लाख रोजगार निर्माण होतील. महाराष्ट्राच्या विकासाचे शत्रू कोण आहेत, हे वेळीच ओळखा. महाराष्ट्राला मागे खेचू पाहणारे महाविकास आघाडीवालेच आहेत, असा आरोप त्यांनी केला.
महायुतीचे सरकारच महाराष्ट्राला खरा न्याय देईल. इथल्या मच्छीमाराला न्याय देण्याचे काम आम्ही करू. 526 मच्छीमार वाडे आणि 15 लाख मच्छीमार यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. या सर्वांचा विकास आम्ही करू. देशाच्या विकासाचा आरसा आता बदलत आहे. सर्व तरुणांना काम आणि भारताला महाशक्तीचे स्थान हेच आमचे ध्येय. सर्वाधिक मत्स्य उत्पादन भारतात होते. 10 वर्षांत ही क्रांती घडली आहे. दहा वर्षांत मत्स्य उत्पादन दुप्पट झाले. 20 हजार करोडची झिंग्याची निर्यात होत होती, ती आता 40 हजार करोडवर गेली. लाखो नवे रोजगार यातून उभे राहिले. सततच्या प्रयत्नामुळे मच्छीमारांचे उत्पन्न वाढत आहे व त्यांचा जीवनस्तर सुधारला आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.