

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी भाषेमध्ये जशी शूरता आहे तशी विरताही आहे, संवेदनाही आहे आणि सहवेदनाही आहे म्हणूनच भक्ति शक्ती युक्ती हे मराठी सामर्थ्य आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ज्ञानेश्वर तुकारमांचे स्मरण करुन त्यांनी दिल्ली मराठी भाषेला अभिवादन करत असल्याचे म्हटले. अखिल भारतीय साहित्य संमेलन हे एका राज्यापूरते मर्यादित राहिले नसून ते आता देशपातळीवर गेले आहे. दिल्लीमध्ये हाणाऱ्या या संमेलनाला माझ्या हस्ते उद्धाटन झाले हे माझे भाग्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलनाने ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्धाटन झाले. दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (तालकटोरा स्टेडियम ) येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरवातीला त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. ‘आज जागतिक मातृभाषा दिन आहे. अतिशय चांगला दिवस तुम्ही साहित्य संमेलनासाठी निवडला’ असे अस्खलित मराठीत बोलून त्यांनी आपल्या भाषणाची सरुवात केली.
पुढे आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी ‘देशाच्या आर्थिक राजधानीतून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व सारस्वतांना माझा नमस्कार’ व ‘ग्यानबा - तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करते’ असे मराठीत बोलत सर्व साहित्यिकांचे स्वागत केले. १८७८ मध्ये पहिल्या आयोजनांतर आजतागायत महादेव गोविंद रानडे, हरी नारायण आपटे, शिवराम परांजपे, वीर सावरक या देशाच्या महान विभूतींनी या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे शरदजींच्या आमंत्रणामूळे या गौरवशाली संमेलनासाठी उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
शंभर वर्षापूर्वी याच पवित्र महाराष्ट्राच्या भूमित राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे बिजे रोवली होती. आज हा संघ वटवृक्षाच्या रुपात आज आपले शताब्दी वर्ष साजरा करत आहे. माझ्यासारख्या लाखो लोकांना देशप्रेमासाठी जगण्याची प्रेरणा संघाने दिली आहे. संघामुळे मराठी भाषा आणि मराठी पंरपरेशी मला जुळता आले.
जगभरात १२ कोटी मराठी भाषिक लोक आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी काही दशके मराठी लोक प्रयत्न करत होते. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. ते काम पूर्ण करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. असेही मोदी यांनी स्पष्ट केले. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर ते संस्कृतीचे संवाहक असते. भाषा समाजात निर्माण होते पण समाज घडवण्याचेही महत्वाचे काम भाषेच्या माध्यमातूनच होत असते. आपल्या मराठीने देशभरातील अनेक लोकांना अभिव्यक्त होण्याची संधी देऊन संस्कृती समृद्ध केली आहे.
सर्मर्थ रामदास यांच्या ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” “आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे” “महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे’ या ओळींचा संदर्भ घेत त्यांनी सांगितले की मराठीत शुरताही आहे विरताही आहे, सौदर्यही आहे संवेदनाही आहे, समानताही आहे समरसताही आहे, आध्यात्माचे स्वर आहेत तर आधुनिकतेची लहरही आहे, मराठीत भक्ती आहे शक्तीही आहे आणि युक्तीही आहे. जेव्हा भारताला आध्यात्माची गरज होती तेंव्हा महाराष्ट्रातील संतांनी प्राचिन काळातील ॠषींच्या ज्ञानाला मराठी भाषेत आणले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत बहिणाबाई, गोरा कुंभार, तुकडोजी महाराज यासह असंख्य संतांनी संत परंपरेच्या माध्यमातून देशाला दिशा देण्याचे काम केले. असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
ग. दी. माडगूळकर, सुधीर फडके यांचेही कार्य आणि मराठी भाषेवरील प्रभाव आपण जाणतो. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवा बाजीराव या वीरांनीही शत्रूंना सळो की पळो करून सोडले. यामध्येही भाषेची भूमिका महत्त्वाची होती. वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक यांना भाषेने मोठे प्रेम दिले. भाषेने सामाजिक मुक्तीचे द्वार उघडले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे काम केले. मराठी भाषेने दलित साहित्य दिले, विज्ञान कथांची रचना केली, तर्कशास्त्रात योगदान दिले. महाराष्ट्रात विचारांना आणि प्रतिभांना महत्व आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील चित्रपट सृष्टीला मोठे होण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्राने, मराठीने मोठे योगदान दिले. सध्या देशात छावा चित्रपटाची धूम सुरू आहे. मात्र अगदी सुरुवातीपासून चित्रपटसृष्टीत सगळ्या गोष्टींना मराठीने मोठी मदत केली. केशवसुत म्हणाल्याप्रमाणे 'जुने जाऊ द्या मरणा लागूनी' या गोष्टीची याप्रसंगी आठवण होते. आपल्या देशात भाषिक विविधता आपल्या एकतेचा सर्वात मोठा आधार आहे. आपली भाषा आईसारखी असते. आईप्रमाणेच भाषाही कुणाशी भेदभाव करत नाही. तसेच भाषेतील साहित्य हे समाजासाठी पथप्रदर्शक आहेत.
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विनय सहस्त्रबुद्धे, उल्हास पवार, खा. स्मिता वाघ, खा. भास्कर भगरे उपस्थित होते.