

नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीचे सार असे वर्णन केलेली ‘श्रीमद्भगवद्गीता’ आणि नाट्यशास्त्रातील अभिजात असे तत्त्वज्ञान मांडणारे ‘भरतमुनींचे नाट्यशास्त्र’ यांचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला.
भगवद्गीता ही पहिल्या शतकातील असून, नाट्यशास्त्र हे पाचव्या शतकातील आहे. सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या घटनेचा गौरव ‘भारतीय संस्कृतीच्या वारशाचा ऐतिहासिक क्षण’, अशा शब्दांत केला. त्यांनी म्हटले, गीता आणि नाट्यशास्त्र केवळ साहित्यिक ठेवा नाहीत, तर भारतीय तत्त्वज्ञान, सौंदर्यद़ृष्टी, जीवनपद्धती आणि अभिव्यक्तीचा पाया आहेत. या नव्या समावेशासह भारताचे आता एकूण 14 ग्रंथ युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय वारसा यादीत सामील झाले आहेत. ‘श्रीमद्भगवद्गीता’ ही महाभारताचा भाग असलेला हिंदू धर्मग्रंथ आहे. तो पहिल्या शतकात तयार झाल्याचे मानण्यात येते. भरतमुनींचे ‘नाट्यशास्त्र’ हे भारतीय नाट्यकलेवरील मूलभूत संस्कृत ग्रंथ आहे, जे नृत्य, संगीत, अभिनय, रंगमंच रचना आणि ‘रस सिद्धांत’ यांचा सविस्तर अभ्यास सादर केला आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी अंतर्गत दस्तऐवजी वारसा संरक्षित आणि सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. गुरुवारी युनेस्कोने एकूण 74 नवीन दस्तऐवजी वारसाचा समावेश केल्याने नोंदणीतील एकूण संग्रह 570 वर पोहोचले. या नव्या समावेशांमध्ये चार आंतरराष्ट्रीय संस्था आणि 72 देशांच्या योगदानाचा समावेश आहे. यामध्ये वैज्ञानिक क्रांती, स्त्रियांचे ऐतिहासिक योगदान तसेच बहुपक्षीयतेच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश आहे. युनेस्कोच्या महासंचालक ऑड्री अझूले यांनी सांगितले, दस्तऐवजी वारसा हा मानवतेच्या सामायिक स्मृतीचा अत्यावश्यक पण नाजूक भाग आहे. त्याचे जतन आणि संरक्षण यासाठी युनेस्को सतत प्रयत्नशील आहे.