

नवी दिल्ली : भारताची मुख्य सायबर सुरक्षा संस्थेने (सीईआरटी-इन) व्हॉटस्अॅप वापरकर्त्यांसाठी एक गंभीर इशारा जारी केला आहे. व्हॉटस्अॅपच्या डिव्हाईस-लिंकिंग सुविधेतील एका त्रुटीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार लोकांची खाती पूर्णपणे ताब्यात घेत असल्याचे समोर आले आहे. या नवीन सायबर हल्ल्याला घोस्ट पेअरिंग असे नाव देण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत गुन्हेगार कोणत्याही पासवर्ड किंवा सिम स्वॅपिंगशिवाय वापरकर्त्याच्या व्हॉटस्अॅपवर नियंत्रण मिळवतात. यामध्ये वेब आवृत्तीद्वारे तुमचे रिअल टाईम मेसेजेस, फोटो आणि व्हिडीओंचा अॅक्सेस हॅकर्सना मिळतो. विशेष म्हणजे यासाठी वापरकर्त्याला कोणतीही संशयास्पद कृती केल्याचे सुरुवातीला जाणवत नाही.
सीईआरटी-इनच्या सल्ल्यानुसार, हा हल्ला सहसा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून आलेल्या मेसेजने सुरू होतो. यामध्ये हा फोटो पाहा असे लिहून एक लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक केल्यावर एक बनावट फेसबुक पेज उघडते, जिथे आशय पाहण्यासाठी व्हेरिफिकेशन म्हणून फोन नंबर विचारला जातो. जेव्हा वापरकर्ता तिथे नंबर टाकतो, तेव्हा तो नकळतपणे हॅकरच्या ब्राऊझरला स्वतःचे व्हॉटस्अॅप लिंक करण्याची परवानगी देतो. एकदा का हॅकरचे डिव्हाईस लिंक झाले की, त्याला व्हॉटस्अॅप वेबप्रमाणेच सर्व अधिकार मिळतात. तो तुमचे जुने मेसेजेस वाचू शकतो, येणारे नवीन मेसेजेस पाहू शकतो आणि तुमच्या नावाने इतरांना किंवा ग्रुपवर मेसेजेस देखील पाठवू शकतो.
अकाऊंटवर पूर्ण ताबा : हॅकर्स पासवर्डशिवाय तुमच्या खात्याचे संपूर्ण नियंत्रण मिळवू शकतात.
बनावट लिंकचा वापर : अनोळखीच्या व्यक्तींकडून आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.
फोन नंबरची गोपनीयता : व्हॉटस्अॅप किंवा फेसबुकच्या नावाखाली बाहेरील वेबसाईटवर आपला फोन नंबर टाकू नका.
वेब अॅक्सेसवर लक्ष ठेवा : आपल्या व्हॉटस्अॅप सेटिंगमधील लिंक्ड डिव्हाईस वेळोवेळी तपासा आणि अनोळखी डिव्हाइस काढून टाका.