

बंगळूर : बंगळूर शहरात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कहर केला असून, सततच्या अतिवृष्टीमुळे बोअरिंग रुग्णालयाजवळील भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. शहरातील विविध भागांत पाणी साचल्याने मेट्रो स्थानके व विधानसौध परिसरातही पाणी घुसल्याची नोंद आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयाची जुनी भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली. त्या वेळी परिसरात उपस्थित असलेले काही व्यापारी व पादचारी ढिगाऱ्याखाली सापडले. सुरुवातीला काही जण जखमी झाल्याचे वृत्त होते; मात्र बचावकार्यादरम्यान मृतांचा आकडा वाढून ८ वर पोहोचला. जखमींवर बोअरिंग रुग्णालयात उपचार सुरू असून वैद्यकीय पथके त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
घटनेची माहिती मिळताच कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली तसेच या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, शहर पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंह यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सतत पाऊस सुरू असतानाही बचाव पथकांकडून ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून, आणखी कोणी अडकले असल्याची शक्यता लक्षात घेऊन शोधमोहीम सावधगिरीने राबवली जात आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक रस्ते, बोगदे आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. मेट्रो स्थानके तसेच विधानसौध परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, या घटनेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी राज्य सरकारवर टीका करत, “या दुर्घटनेस राज्य सरकार जबाबदार आहे,” असा आरोप सोशल मीडियावर केला आहे.