अवघ्या सहा मिनिटांत 80 टक्के चार्ज होणारी बॅटरी विकसित

सोडियम-आयनच्या वापरामुळे नवी क्रांती
battery innovation
अवघ्या सहा मिनिटांत 80 टक्के चार्ज होणारी बॅटरी विकसित
Published on
Updated on

नवी दिल्ली : अवघ्या सहा मिनिटांत 80 टक्के चार्ज होणारी सोडियम-आयन बॅटरी जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्रातील संशोधकांनी शोधली आहे. मोटारींपासून ते खेड्यांपर्यंत वीजपुरवठ्यासाठी परवडणारी जलद आणि सुरक्षित बॅटरी आवश्यक बाब बनली आहे. लिथियम-आयन बॅटर्‍यांनी आजवर या क्रांतीला चालना दिली असली, तरी त्या महाग आहेत. याशिवाय, लिथियमसाठी लागणारे स्रोत मर्यादित आणि भू-राजकीयद़ृष्ट्या गुंतागुंतीचे आहेत; पण बंगळूरमधील शास्त्रज्ञांनी आता त्याला हा मजबूत पर्याय शोधला आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेंतर्गत येणार्‍या जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्रातील संशोधकांनी एक अत्यंत वेगाने चार्ज होणारी सोडियम-आयन बॅटरी विकसित केली आहे. ही बॅटरी नॅसिकॉन प्रकारातील कॅथोड आणि अ‍ॅनोड साहित्यावर आधारित असून, केवळ सहा मिनिटांत 80 टक्के चार्ज होते आणि 3,000 पेक्षा अधिक चार्ज सायकल्सपर्यंत टिकते.

सामान्य सोडियम-आयन बॅटर्‍यांमध्ये चार्जिंगचा वेग कमी आणि आयुष्य कमी असते; पण या नव्या बॅटरीमध्ये रसायनशास्त्र आणि नॅनो तंत्रज्ञानाचा समन्वय साधत हे दोन्ही दोष दूर करण्यात आले आहेत. प्रा. प्रेमकुमार सेंगुट्टुवन आणि पीएच.डी. विद्यार्थी बिप्लब पत्रा यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांनी अ‍ॅनोडसाठी नवीन साहित्य तयार केले आणि तीन महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. कणांचे आकार नॅनोस्तरावर आणणे, त्यांना कार्बनच्या पातळ थराने आवरण देणे आणि अ‍ॅनोडमध्ये थोडीशी अ‍ॅल्युमिनियमची भर घालणे. या सुधारांमुळे सोडियम-आयन अधिक जलद आणि सुरक्षितपणे हालचाल करू लागले, ज्यामुळे गती आणि टिकाऊपणा प्राप्त झाला.

सोडियम हा भारतात सहज उपलब्ध आणि स्वस्त आहे, तर लिथियम दुर्मीळ आणि प्रामुख्याने आयात केला जातो. त्यामुळे सोडियमवर आधारित बॅटरीमुळे भारत ऊर्जा संचयनाच्या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होऊ शकतो. ते ‘आत्मनिर्भर भारत’साठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. फक्त खर्चाच्याच द़ृष्टीने नव्हे, तर या सोडियम-आयन बॅटर्‍या इलेक्ट्रिक वाहनांपासून ते सौरऊर्जा ग्रीड, ड्रोन आणि ग्रामीण घरांपर्यंत सर्व क्षेत्रात उपयोगी ठरू शकतात, ज्यामुळे स्वच्छ ऊर्जा गरज असेल त्या ठिकाणी पोहोचवता येईल.

या तंत्रज्ञानाची तपासणी उच्चस्तरीय पद्धतींनी करण्यात आली आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रो केमिकल सायकलिंग आणि क्वांटम सिम्युलेशन्सचा समावेश आहे. विशेषतः महत्त्वाचे म्हणजे, हे तंत्रज्ञान केवळ जलद चार्जिंगच सक्षम करत नाही, तर पारंपरिक बॅटर्‍यांमधील आगीचे आणि घटण्याचे धोकेही टाळते. या बॅटर्‍या बाजारात येण्यासाठी अजून थोडी प्रगती आवश्यक असली, तरी हा शोध हे एक मोठे पाऊल आहे. शास्त्रीय समुदायातही याची दखल घेतली जात आहे आणि सततच्या पाठबळामुळे भारत लवकरच हरित बॅटरी तंत्रज्ञानाच्या जागतिक शर्यतीत आघाडीवर असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news