

bareilly bride ran away younger sister truth revealed dispute wedding canceled
पुढारी ऑनलाईन : लग्न हा आयुष्यातील पवित्र क्षण माणला जातो. दोन भिन्न व्यक्ती लग्न विधीच्या माध्यमातून आयुष्याची सोबत करण्यासाठी एकत्र येत असतात. मात्र सध्याच्या काळात असे काही नातेसंबंध बनत आहेत की ज्यामुळे लग्न संस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
असाच एक प्रसंग उत्तर प्रदेशातील बरेली येथे समोर आला आहे. लग्नापूर्वी नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन्ही कुटुंबांनी परस्पर संमतीने तिच्या धाकट्या बहिणीसोबत लग्न लावण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर धाकट्या बहिणीबाबतही एक धक्कादायक गोष्ट समोर आली. लग्नाच्या आधीच दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर जोरदार मारामारीत झाले.
बरेलीतील बिथरी चैनपूर परिसरातील एका लग्नघरात शनिवारी असा हायव्होल्टेज ड्रामा घडला की आनंदाचे वातावरण क्षणार्धात रणांगणात बदलले. लग्नापूर्वी नवरी प्रियकरासोबत फरार झाली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी नवरीच्या धाकट्या बहिणीसोबत लग्न लावण्याचे ठरवले. मात्र ऐनवेळी तिचेही प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. ही बाब कळताच दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लाठी-काठ्या, विटा आणि दगडफेक झाल्याने तीन जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
बिथरी चैनपूरमधील एका गावातील तरुणीचे लग्न शेजारच्या गावातील युवकासोबत ठरले होते. शनिवारी नरियावल येथील लग्नघरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र शुक्रवारी रात्रीच नवरी दागिने घेऊन प्रियकरासोबत पळून गेली. या घटनेमुळे खळबळ उडाली आणि ही माहिती वरपक्षापर्यंत पोहोचली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये अनेक तास पंचायत झाली. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर समजूत काढल्यानंतर नवरीच्या धाकट्या बहिणीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लाठी-काठ्या आणि दगडफेक
यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार मारामारी झाली. लाठी-काठ्या, विटा आणि दगडफेक करण्यात आली. या गोंधळात लग्नाला आलेली नवरीची चुलत बहीण, तिचा दीर आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाले. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. या गोंधळ आणि मारहाणीनंतर लग्न रद्द करण्यात आले आणि वरात नवरीशिवाय परतली.
लग्नापूर्वी उघड झाले दुसरे गुपित
शनिवारी ठरलेल्या वेळेनुसार वरात नरियावल येथील लग्नघरात पोहोचली होती. विवाहाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच कोणीतरी वरपक्षाला माहिती दिली की धाकट्या बहिणीचेही एका युवकासोबत प्रेमसंबंध आहेत आणि ती देखील हे लग्न करू इच्छित नाही. ही माहिती समोर येताच वातावरण तापले. दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि काही क्षणांतच त्याचे रूपांतर मारामारीत झाले.
या प्रकरणाबाबत बिथरी चैनपूरचे पोलीस ठाणे प्रभारी राजेश मिश्रा यांनी सांगितले की, ज्या तरुणीचा विवाह होणार होता ती प्रियकरासोबत निघून गेली होती. त्यानंतर तिच्या बहिणीसोबत विवाह करण्याची चर्चा सुरू झाली; मात्र तिचेही प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्यानंतर लग्नघरात दोन गटांमध्ये मारामारी झाली. या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाले असून काही लोकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.