पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या अवामी लीग पक्षातील नेत्यांच्या मालमत्तांना लक्ष्य केले जात आहे. आता हिंचारावर नियंत्रण अणाणण्यासाठी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने 'ऑपरेशन डेव्हिल हंट' सुरू केले आहे. आतापर्यंत १,३०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
गाझीपूरमध्ये अवामी लीग पक्षाच्या नेत्यांच्या निवासस्थानवर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले. यानंतर या हिंसाचाराचे लोण देशातील अन्य भागातही पसरले. गेल्या चार दिवसांपासून विविध ठिकाणी हिंसाचाराचा भडका उडाला हाेता.
बांगलादेशमधील शेख हसिना यांच्या सरकारविरोधात विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. अखेर ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसिना यांना देशातून पलायन करत भारतात आश्रय घेतला. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील संघटनांनी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार स्थापन केले. मात्र यानंतर शेख हसीना यांच्या अवामी लीग आणि युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या समर्थकांमध्ये संघर्ष सूरुच राहिला.
बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी हजारो निदर्शकांनी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानाला आग लावली. १९७१ मध्ये पाकिस्तानपासून बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा याच ऐतिहासिक इमारतीत रहमान यांनी केली होती. यानंतर या हिंसाचारा वणवा अन्य ठिकाणीही पोहचला. अवामी लीग पक्षाच्या नेत्यांच्या निवासस्थानवर हल्ला सुरु झाले.
हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी बांगलादेश लष्कर, पोलीस आणि विशेष सुरक्षा दलांनी ऑपरेशन डेव्हिल हंट सुरु केले आहे. या कारवाईत अंतर्गत आतापर्यंत १,३०८ दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे. आता देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. जोपर्यंत देशातील दंगलखोरांचा नायनाट होत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन सुरूच राहील," असे बांगलादेशचे गृह व्यवहार सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
ऑपरेशन डेव्हिल हंटवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी, एक कमांड सेंटर स्थापन करण्यात आले आहे आणि ते काम करू लागले आहे, असे मुख्य सल्लागार कार्यालयाने सांगितले. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार युनूस यांनी कायदा आणि सुव्यवस्था आणि पदच्युत पंतप्रधानांच्या कुटुंबाच्या अवामी लीगच्या नेत्यांच्या मालमत्तेवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन केले आहे.