

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचारात बांगालादेशातील दंगेखोरांचा सहभाग होता, असे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याचे तपास यंत्रणेने केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगितले आहे. दरम्यान, जांगीपूर, धुलियान, सुती आणि शमशेरगंज सारख्या संवेदनशील भागात बीएसएफ, सीआरपीएफ, राज्य सशस्त्र पोलिस आणि आरएएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. गेल्या ४८ तासांत या परिसरातील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. हिंसाचारप्रकरणी २१० जणांना अटक करण्यात आली आहे. (Murshidabad Violence)
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सुती आणि समसेरगंज येथे वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. हल्लेखोरांनी अनेक दुकाने आणि वाहनांना आग लावली. स्थानिकांच्या घरांवर दगडफेकही केली. 'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून झालेल्या व्यापक हिंसाचाराच्या प्राथमिक चौकशीत बांगलादेशी उपद्रवी लोकांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. मुर्शिदाबाद जिल्हा आणि दक्षिण २४ परगणा येथे वक्फ कायद्यावरून निदर्शने सुरू असताना घुसखोरांवर नियंत्रण ठेवण्यात पश्चिम बंगाल सरकारला अपयश आले. या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी तृणमूल सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा पथके तैनात करावीत, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. तर राज्यात वक्फ कायदा लागू करणार नाही, असा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
मुर्शिदाबाद हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत एकूण २१० लोकांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचाराग्रस्त भागातील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. दरम्यान, मुर्शिदाबादच्या धुलियान येथे पिता-पुत्राच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक केली असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफवा पसरवल्याबद्दल १०९३ सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक केल्या आहेत. एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे.