

विशाखापट्टणम; वृत्तसंस्था : भारताने बंगालच्या उपसागरात ‘आयएनएस अरिघात’ या अण्वस्त्र पाणबुडीवरून ‘के-4’ या पाणबुडीतून डागल्या जाणार्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. भारताच्या न्यूक्लियर ट्रायड (अण्वस्त्र त्रिकूट) आणि धोरणात्मक अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमतेच्या द़ृष्टीने हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.
या क्षेपणास्त्राची चाचणी त्याच्या पूर्ण 3,500 कि.मी.च्या पल्ल्यासाठी करण्यात आली. ही चाचणी भारताची तिसरी अण्वस्त्रधारी पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’वरून घेण्यात आली. यापूर्वी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये याच पाणबुडीवरून ‘के-4’ची चाचणी घेण्यात आली होती.
भारताच्या अण्वस्त्र त्रिकुटात (जमीन, हवा आणि पाणी) सागरी मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अण्वस्त्रधारी पाणबुड्या या शोधणे कठीण असते; कारण त्या पारंपरिक पाणबुड्यांच्या तुलनेत अधिक शांत असतात आणि अनेक महिने पाण्याखाली राहू शकतात. त्यामुळे शत्रूने पहिल्यांदा अण्वस्त्र हल्ला केला, तरी समुद्रातून प्रत्युत्तर देण्याची भारताची क्षमता यामुळे अधिक मजबूत झाली आहे.
भारताच्या सामर्थ्यांमध्ये वाढ
‘के-4’ क्षेपणास्त्राच्या वाढलेल्या पल्ल्यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लांब पल्ल्याच्या शत्रूंच्या विरोधात भारताचे सामर्थ्य वाढले आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या ताफ्यातील 750 कि.मी. पल्ला असलेल्या ‘के-15 सागरिका’ आणि भविष्यातील अधिक लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमधील महत्त्वाची दरी भरून काढते.