

नवी दिल्ली : संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत केली.
सोमवारी लोकसभेत बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळेच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, याबाबतची मागणी आम्ही वेळोवेळी सर्व स्तरावर केली आहे. तसेच त्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशीही आमची मागणी आहे, असेही खा. सोनवणे म्हणाले. दरम्यान, बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात खा. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीतही त्यांनी संतोष देशमुख यांच्या मृत्यू संदर्भात आणि जिल्ह्यातील कायदा व्यवस्थेसंदर्भात निवेदन दिले होते.