

Badrinath–Kedarnath Temple Mobile Ban
डेहराडून: बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरात परिसरात आता मोबाईल फोन नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गढवालचे विभागीय आयुक्तांच्या ध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाविकांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिर परिसराबाहेर योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरातील गर्भगृहात दर्शन घेतल्यावर भाविक तिथेच फोटो आणि सेल्फी काढण्यात व्यस्त होतात, ज्यामुळे दर्शनाचा वेग मंदावतो आणि इतर भाविकांचा प्रतीक्षा काळ वाढतो. हा अडथळा दूर करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
ऋषिकेश येथील ट्रान्झिट कॅम्प कार्यालयात गढवालचे विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाविकांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिर परिसराबाहेर योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश पांडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत."भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येऊ नये, याची जबाबदारी 'बद्री-केदार मंदिर समिती'ची आहे," असे सांगत पांडे यांनी मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिरांच्या जवळ सुसज्ज केंद्रे उभारण्याच्या सूचना केल्या.
प्रशासनाने २०२४ मध्ये चारधाम मंदिरांच्या ५० मीटर परिसरात फोटोग्राफी आणि सेल्फी घेण्यावर आधीच बंदी घातली होती. मात्र, या नियमानंतरही भाविक छुप्या पद्धतीने फोटो काढत असल्याने दर्शनाच्या रांगांमध्ये दिरंगाई होत होती. ही समस्या कायम राहिल्याने आता मोबाईल नेण्यावरच थेट बंदी घालण्याचा कठोर निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे.