

पुढारी ऑनलाईन डेस्क : बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) च्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात आज (दि.६) पहाटे उत्तर प्रदेश 'एसटीएफ' आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाईत हे यश मिळवले. अटक करण्यात आलेला दहशतवादी लाजर मसीह हा पंजाबमधील अमृतसर येथील रहिवासी आहे.
'ANI'ने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेला दहशतवादी लाजर मसीह हा बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) च्या जर्मन-आधारित मॉड्यूलचा प्रमुख स्वर्ण सिंग उर्फ जीवन फौजीसाठी काम करत होता. तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या थेट संपर्कात होता. मसीह याच्याकडून तीन जिवंत हँडग्रेनेड, दोन डेटोनेटर्स, १३ काडतुसे, विदेशी पिस्तूल आणि स्फोटक पदार्थाची पावडर जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडे गाझियाबादचा पत्ता असलेले आधार कार्ड आणि एक मोबाईल फोनही (सिम कार्डशिवाय) सापडला आहे.
लाजर मसीह हा पंजाबमधील अमृतसरमधील रामदास भागातील कुर्लियान गावचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते.दहशतवादी लाजर मसीह हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या संपर्कात होता. तो २४ सप्टेंबर २०२४ रोजी पंजाबमधील न्यायालयीन कोठडीतून पळून गेला.
यापूर्वी, अब्दुल रहमान नावाच्या दहशतवाद्याला ३ मार्च रोजी हरियाणातील फरीदाबाद येथील बान्स रोड पाली येथून अटक करण्यात आली होती. इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेने अब्दुल रहमानला अयोध्या राम मंदिरावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण दिले होते. ISISची शाखा असलेल्या इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांताने या हल्ल्याचा कट रचला हाेता, अशी माहिती तपासात समाेर आली आहे. अब्दुल गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ISISच्या संपर्कात होता. एका साेशल मीडिया ग्रुपमध्ये एका विशिष्ट धर्माला दुखावणारे व्हिडिओ पोस्ट केले गेले हाेते. वेगवेगळ्या व्यक्तींकडून काही रेकॉर्ड केलेले व्हिडिओ संदेशही ग्रुपमधील लोकांना पाठवण्यात आले हाेते. या संदेशांमध्ये अब्दुल आणि त्याच्यासारख्या इतर तरुणांना सांगण्यात आले होते की, अयोध्येत तुमच्यावर अत्याचार झाले आहेत आणि आता तुम्हाला त्याचा बदला घ्यावा लागेल. त्याचप्रमाणे, ते हल्ल्यासाठी तयार करत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.