

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणातील आरोपी सॉक्समध्ये आणि खिशात नोटा लपवून घेऊन जात असत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तुरुंगात जाऊन या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडे स्वतंत्र चौकशी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आयटी तज्ज्ञांच्या मदतीने डिलिट केलेले सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर केले आहे. या फुटेजमध्ये आरोपी चोरी करताना दिसत आहेत, मात्र आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. पोलिस या फुटेजची गुणवत्ता (क्वालिटी) सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे रविवारी दुपारी १.५० वाजता पोलिस तुरुंगात बंद असलेल्या आरोपींची चौकशी करण्यासाठी पोहोचले. रमाशंकर मिश्रा, मनीष यादव, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा आणि करुणेश पांडे या आरोपींची चौकशी सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी ३ आरोपींची चौकशी केली आहे.
शनिवारी अयोध्या तुरुंगातील सर्व आरोपींना वेगवेगळ्या बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे. हे सर्वजण आपापसात भांडण करू शकतात किंवा एखादा कट रचू शकतात, अशी शंका पोलिसांना होती. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे.
जनतेत चुकीचा संदेश : नितीन नवीन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. लखनौमध्ये बोलताना ते म्हणाले, जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे. यामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. राज्य सरकार यावर कारवाई करत असून दोषींना सोडले जाणार नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, तपास पूर्ण झाल्यानंतर एसआयटी १५ जुलै नंतर एफआयआर दाखल करू शकते. या गुन्ह्यात मंदिर ट्रस्टच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेले चंपत राय, ट्रस्टी डॉ. अनिल मिश्रा आणि गोपाळ राव यांना आरोपी केले जाऊ शकते.
लाजिरवाणी घटना : गोविंदगिरी महाराज
अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी म्हणाले, ही घटना लाजिरवाणी आहे. न्यासाकडून (ट्रस्ट) एक रुपयाही घेतला नाही.
गोविंद देव गिरी महाराज यांनी पत्र प्रसिद्ध करून देणगी चोरी प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, या चोरीच्या घटनेमुळे मी अत्यंत दुखावलो गेलो आहे, मला खूप दुःख झाले असून मी लज्जित आहे. मी माझ्या वास्तव्यासाठी (प्रवासासाठी) न्यासाकडून एक रुपयाही घेतलेला नाही.