

Attukal Pongala केरळमध्ये दरवर्षी साजरा केला जाणाऱ्या ‘आट्टुकल पोंगाला’ हा सण साजरा करण्यासाठी थिरुअनंतपूरमध्ये लाखो महिला भक्तांनी गर्दी केली होती. या महोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे आराध्य दैवत 'देवी भद्रकाली'ची पूजा केली जाते व या देवीला मोकळ्या जागेत तयार केलेला नैवेद्य अर्पण केला जातो. त्यासाठी हजारो महिलांनी रस्त्यावरच चूली मांडल्या व त्यात देवीसाठी नैवेद्य तयार केला. या महोत्सवामुळे मंगळवारी केरळच्या राजधानीत एकच गर्दी झाली होती. थिरुवनंतपुरमचे रस्ते भक्ती रसान न्हावून निघाले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही नोंद
या उत्सवाने 'महिलांचा सर्वात मोठा धार्मिक मेळावा' म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. एकाच दिवशी कोट्यवधी महिला एकाच ठिकाणी जमा होऊन हा विधी करतात. त्यामुळे याची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाते. जगातील महिला भाविकांच्या सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी हा 'आट्टुकल पोंगाला' एक मानला जाणारा हा विधी 'आट्टुकल भगवती मंदिरा'भोवती केंद्रित आहे.
आज मंगळवार 3 मार्च रोजी केरळसह आसपासच्या शेजारील राज्यांमधून आलेल्या लाखो महिला राजधानीत 'आट्टुकल पोंगाला' साजरा करण्यासाठी एकत्र आल्या. जगातील महिला भाविकांच्या सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी हा एक आहे. रस्ते, अंगणे आणि मोकळ्या जागांवर महिला शिस्तबद्ध रांगांमध्ये उभ्या होत्या. प्रत्येकीकडे मातीचे भांडे, विटांची चूल आणि जळण होते, ज्याद्वारे त्यांनी देवीला पोंगाला अर्पण करण्याची तयारी केली होती.
काय असतो 'पोंगाला' विधी?
'पोंगाला' म्हणजे 'उकळणे' किंवा 'नवे तांदूळ शिजवणे'. मातीच्या मडक्यात तांदूळ, गूळ, खोबरे आणि तूप घालून गोड पदार्थ शिजवला जातो. हा नैवेद्य देवी भगवतीला (कन्नगीचे रूप) अर्पण केला जातो. या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या ५-१० किलोमीटरच्या परिघात महिला रस्त्याच्या कडेला चूल मांडून बसतात. मात्र, कुठेही गोंधळ नसतो; संपूर्ण शहर एका मोठ्या स्वयंपाकघरात रूपांतरित होते.
काय आहे परंपरा
ही प्रथा १० दिवस चालणाऱ्या उत्सवाचा नववा दिवस असतो. असे मानले जाते की हा नैवेद्य अर्पण केल्याने घरातील दुःख दूर होते आणि सुख-समृद्धी लाभते. त्यामुळे केरळ सहित आसपासच्या राज्यातून महिला देवीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी येथे हजेरी लावतात.