ठाणे जिल्ह्यातील वसई येथे १८ जून रोजी तरुणाने आपल्या प्रेयसीची लोखंडी पान्याने वार करुन हत्या केली होती. हत्येनंतर आरोपी घटनास्थळीच बसून होती. भर रस्त्यात घडलेल्या या प्रकाराने महाराष्ट्र हादरला होता. कारण तरुण आपल्या प्रेयसीवर अमानूषपणे लोखंडी पान्याने वार करत राहिला मात्र यावेळी गर्दीतील एकही जण तरुणीच्या बचावासाठी पुढे आला नाही. काही जण ही भयंकर घटना आपल्या मोबाईल फोनमध्ये शूट करण्यात गुंग होते. काही क्षणात या घटनेचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. मात्र या व्हिडिओच्या वापर आता 'लव्ह जिहाद'चा प्रकार म्हणून केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वसईत तरुणीची झालेली हत्या हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा दावा व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे. वसई आपल्या प्रेयसीचा खून करणारा तरुण हा सलीम नावाचा मुस्लिम तरुण आहे. त्याने आरती नावच्या हिंदू मुलीची हत्या केली असल्याचा दावा या व्हिडिओमधून केला जात आहे. एक मिनिट आणि 24 सेकंदांचा हत्येचा व्हायरल व्हिडिओला हिंदी कॅप्शनसह शेअर केले जात आहे. यामध्ये असे म्हटलं आहे की, "सलीमने आरतीला प्रपोज केले, पण आरतीने नकार दिला. त्यानंतर सलीमने आरतीचा रस्त्यावर सर्वांसमोर खून केला आणि मृतदेहाजवळ आरामात उभा राहिला. त्याला काही बोलण्याची कोणाची हिंमत झाली नाही. "
वास्तविक ठाणे जिल्ह्यातील वसई येथे १८ जून रोजी तरुणीची भररस्त्यात हत्या झाली. वास्तविक या घटनेतील पीडिता आरती यादव ही २२ वर्षांची तरुणी आहे. तर तिच्या खून करणारा रोहित यादव (२९) आहे. दोघेही हिंदू आहेत. मात्र सोशल मीडियीच्या माध्यमातून धार्मिक व्देष पसरविण्यांनी चुकीची माहिती देत हा व्हिडिओ शेअर केला आहे.
नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) आणि आरती यादव (२२) या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहित याला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. रोहित संतप्त झाला होता. मंगळवार १८ जून रोजी सकाळी रोहितने आरतीवर लोखंडी पान्याने सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले त्यात ती गतप्राण झाली. हत्येनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रोहितला ताब्यात घेतले, हे वास्तव असताना धर्मांध लोकांकडून वसई येथील तरुणीचा खून हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याची चुकीची माहिती दिली जात आहे.