

छतरपूर : पुढारी ऑनलाईन
महाकुंभा दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रयागराजला निघालेल्या रेल्वेवर जमावाने हल्ला केल्याचे समोर आले आहे. ही घटना मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील हरलापूर स्टेशनवर घडली. अचानक झालेल्या तोडफोडीमुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. (Mahakumbh Mela 2025)
ही घटना झांसी मंडलच्या हरपालपूर स्टेशनची आहे. अशी माहिती समोर येत आहे की, या रेल्वेवर इतक्या भयावह प्रकारे हल्ला करण्यात आला की, रेल्वेच्या बोगीमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये कल्लोळ माजला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्या व्हिडिओमध्ये लोकांचा मोठा समुह अचानक गर्दीत सामील झाला अन् रेल्वेच्या बोगीवर दगडफेक करू लागला.
सांगण्यात येत आहे की, लोकांची ही गर्दी रेल्वेत घुसण्याचा प्रयत्न करत होती. पण जेंव्हा लोकांना रेल्वेत आत जाता येईना तेंव्हा लोकांनी रेल्वेच्या बोगीच्या दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या. उद्या मौनी अमावस्या आहे. त्यामुळे प्रयागराजमध्ये रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराजध्ये स्नानासाठी पोहोचतील असे सांगण्यात येत आहे.
रेल्वेवर अशा प्रकारे झालेल्या हल्ल्यामुळे रेल्वे सुरक्षेच्या मुद्यावरून टीका केली जात आहे. महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या सरकारने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कुंभ नगरी प्रयागराजमध्ये ठिक-ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सोबतच प्रशासकीय अधिकारीही परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
महाकुंभात २८ जानेवारी २०२५ च्या सकाळपर्यंत १५ कोटींहून अधिक भाविकांनी आस्थेची डुबकी घेतली आहे. या सर्व भाविकांनी गेल्या १७ दिवसात संगमात डुबकी घेतली आहे. मकर संक्रातीच्या दिवशी ३.५ कोटी भाविकांनी, संतांनी अमृत स्नान केले. तर उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी ८ ते १० कोटी भाविक पवित्र स्नानाची पर्वणी साधतील असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.