

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सादर केलेल्या कॅग अहवालावर दोन दिवसांच्या चर्चेनंतर, गुरुवारी विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी लोकलेखा समिती स्थापन केली. पुढील तीन महिन्यांत ही समिती या अहवालात अधोरेखित केलेल्या आर्थिक अनियमितता आणि इतर बाबींची चौकशी करुन आपला अहवाल सादर करेल. यासोबतच, आम आदमी पक्षाच्या सरकारने बनवलेल्या नवीन मद्य धोरणाबाबत एका महिन्याच्या आत कृती अहवाल सादर करण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाच्या निलंबित आमदारांना विधानसभेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षनेत्या अतिशी यांच्या नेतृत्वात ‘आप’च्या आमदारांनी विधानसभेबाहेर निदर्शने केली.
मंगळवारी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कॅगचा अहवाल सादर केला. त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी यावर सभागृहात चर्चा झाली. दोन दिवसांची चर्चा पूर्ण झाल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितले की, हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की 'दिल्लीतील दारूचे नियमन आणि पुरवठा' संबंधित कॅग ऑडिट अहवालात दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीत 'आप' सरकारने केलेल्या गंभीर अनियमितता उघड झाल्या आहेत.
विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, खाजगी कंपन्या सरकारी खर्चावर बेकायदेशीरपणे नफा कमवू शकतील यासाठी सरकारी तिजोरीचे कसे मोठे नुकसान झाले याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. हे ऑडिट २०१७-२०२१ या कालावधीसाठी करण्यात आले.
कॅग अहवालावरील चर्चेत विरोधी पक्षाकडून एकमेव आमदार अमानतुल्लाह खान सभागृहात उपस्थित होते. त्याचे कारण म्हणजे इतर आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ‘आप’च्या आमदारांना विधानसभेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यानंतर, विरोधी पक्षनेत्या अतिशी यांच्यासह ‘आप’च्या आमदारांनी विधानसभेच्या बाहेर 'जय भीम'चे पोस्टर घेऊन निदर्शने केली. अतिशी म्हणाल्या की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदारांना विधानसभेत जाण्यापासून रोखले जात आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नाव सुचवल्यानंतर सहा वेळा भाजपचे आमदार राहिलेले मोहन सिंग बिश्त यांची दिल्ली विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली. मुख्यमंत्री गुप्ता यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी अनुमोदन दिले, तर अनिल कुमार शर्मा यांनी मांडलेल्या दुसऱ्या प्रस्तावाला गजेंद्र सिंग यादव यांनी अनुमोदन दिले. तर विरोधी पक्षनेत्या म्हणून अतिशी यांच्या निवडीला विधानसभा अध्यक्षांनी मंजूरी दिली. या अगोदर आम आदमी पक्षाने अतिशी यांची निवड विरोधी पक्षनेत्या म्हणून केली आहे. यापूर्वी विधानसभेचे अधिवेशन २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान चालणार होते. त्यानुसार, आज त्याचा शेवटचा दिवस होता. परंतु नंतर अधिवेशन ३ मार्चपर्यंत वाढविण्यात आले.