Assembly Election Results 2026 : पाच राज्यांच्या निकालांकडे देशाचे लक्ष! बंगालमध्ये ममतांची 'दीदीगिरी' की भाजपची 'मुसंडी'?

तामिळनाडूमध्ये पिनराई विजयन इतिहास घडवणार की स्टॅलिन गड राखणार?
Assembly Election Results 2026
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवारी (दि. ४) होणार असून संपूर्ण देशाचे आणि विशेषतः राष्ट्रीय पक्षांच्या मुख्यालयांचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये काही दिवसांपूर्वी टप्प्याटप्याने मतदान पार पडले. तत्पूर्वी विविध पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकांच्या निकालानंतर प्रादेशिक तसेच राष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव पडू शकतो. पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काय येतो, यावर राष्ट्रीय राजकारणाची बरीच समीकरणं अवलंबून आहेत, त्यामुळे या निकालांकडे प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. तिथे तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. काँग्रेसने निवडणूक लढवली खरी मात्र मुख्य लढतीत काँग्रेस पक्ष नसल्यासारखी परिस्थिती होती. बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रादेशिक अस्मिता आणि विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केला, तर भाजपने सत्तांतराचा जोरदार प्रयत्न केला. त्यामुळे येथील निकाल देशासाठी लक्षवेधी असणार आहे.

आसाममध्ये भाजप सत्तेत असून मुख्यमंत्री हेमंता विश्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेस पक्षाने भाजपला कडवे आव्हान दिले आहे. येथे विकास, ओळख राजकारण आणि स्थानिक प्रश्न महत्त्वाचे ठरले आहेत. तर तमिळनाडूमध्ये सध्या द्रमुकची सत्ता असून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा जनतेचा कौल मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. इथे काँग्रेस पक्षाची प्रमुख सोबत आघाडी आहे. त्यांच्या विरोधात एनडीए म्हणून अण्णाद्रमुक आणि भाजपने जोरदार आव्हान उभे केले आहे. राज्यात स्थानिक मुद्दे, कल्याणकारी योजना आणि नेतृत्वाचा प्रभाव या गोष्टी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये एलडीएफ आघाडी सत्तेत असून मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाची ही मोठी परीक्षा मानली जात आहे. यूडीएफ आघाडीने सरकारविरोधी मुद्द्यांवर प्रचार करत सत्ता परिवर्तनाचा दावा केला आहे. केरळमध्ये पारंपरिक सत्तांतराची पद्धत मोडली जाईल का, याबाबत उत्सुकता आहे. पुदुच्चेरीमध्ये एनडीए आघाडी सत्तेत असून काँग्रेस आणि इतर स्थानिक पक्षांनी त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली आहे. पुदुच्चेरी हे लहान राज्य असले तरी येथील निकालही राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.

पाच राज्यांपैकी भाजप किंवा भाजप प्रणित एनडीए आघाडीची सत्ता आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये आहे. याव्यतिरिक्त तमिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधकांची सत्ता आहे. भाजपला जर पाचही राज्यात जोरदार मुसंडी मारता आली तर भाजपाचे केंद्रातील सरकार आणखी मजबूत स्थितीत येईल. विविध राज्यातून भाजपचे आणि मित्र पक्षांचे राज्यसभेतील खासदारही वाढतील. परिस्थिती पूर्वी होती तशीच राहिली तरीही भाजपाला विशेष फरक पडणार नाही. मात्र विरोधी पक्षाला विशेषतः काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक यांना आपापली राज्य राखता आली तर त्यांच्या संघर्षाची धार तीव्र होऊ शकते आणि या माध्यमातून ते पुढच्या लढाईसाठी सज्ज होतील. पाच राज्यात नेमकं काय होईल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. त्यामुळे स्वाभाविकच केंद्रात सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि इतरही सर्वच पक्षांचे लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे आहे.

एकूणच, या पाच राज्यांच्या निकालांमधून मतदारांचा कल कोणत्या दिशेने आहे, सत्ताधाऱ्यांवर जनतेचा विश्वास कायम आहे का आणि विरोधकांना कितपत यश मिळते, याचे स्पष्ट चित्र आज समोर येणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news